औरंगाबाद : सध्या लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळात आहे. मात्र लसींच्या अभावामुळे सतत लसीकरण थांबत आहे. आज मंगळवारी सकाळपासूनच हर्सूल येथील मनपाच्या लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांची होत्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मात्र १२ वाजले तरीही लसीकरण सुरु न झाल्याने या ठिकाणी नागरिक संतापात होऊन हमरीतुमरीवर उतरले. या ठिकाणी नागरिकांची बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दिडशे लसी प्रत्येक केंद्रांवर वितरीत केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी समजुतीने घ्यावे आणि मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.
सोमवारी जिल्ह्याला २६ हजारांचा साठा प्राप्त झाला. यातून केवळ १० हजार लसी मनपास देण्यात आल्या आहेत. मात्र हा साठा एकाच दिवसात संपेल. त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पाच गिरवावे लागणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात आली आहे. औरंगाबादकरांकडून लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र वारंवार लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास होत आहे.
गेल्या आठवड्याभरात केवळ दोन ते तीनच दिवस लसीकरण सुरु होते. आत्तापर्यंत १५ हजार, १२ हजार या प्रमाणात लसींचा पुरवठा झाला. मात्र लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दोनच दिवसात हा साठा संपत आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेला रोखण्यासाठी किमान ७० टक्के नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी यापूर्वीच म्हटले आहे. मात्र जोपर्यंत जास्तीचा साठा मनपास प्राप्त होत नाही तोपर्यंत ७० टक्के लसीकरण होणे अशक्यप्रायच आहे.