वर्ध्यात भाजपचे रामदास तडस खासदारकीची हॅट्रिक करणार? की अमर काळे बाजी मारणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा गांधी यांची कर्मभूमी, भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचं केंद्र बनलेला सेवाग्राम आश्रम आणि विनोबा भावे यांच्या रूपाने भूदान चळवळीची बीज ज्या मातीत रुजली तो म्हणजे वर्धा जिल्हा.. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच काँग्रेसच्या खाणाखुणा अंगावर घेत वाढलेल्या वर्ध्यातील जततेनं स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसलाच जवळ केलं…पक्षातील महत्त्वाच्या सभा, बैठका असोत…किंवा प्रचाराचा नारळ फोडायचा असो…काँग्रेस आणि विरोधकांसाठी वर्धा यासाठी नेहमीच टॉप प्रायोरिटी राहिली आहे…काँग्रेसचा एखादी बालेकिल्ला असणाऱ्या या वर्ध्याला 2014 नंतर मात्र रामदास तडस यांच्या रूपाने भाजपने सुरुंग लावला…सलग दोन टर्म निवडून येत त्यांनी एक दशक काँग्रेसला या जिल्ह्यातून बाहेर ठेवलं…आता महाविकास आघाडीमध्ये वर्ध्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली असून अमर काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे वर्ध्यात खऱ्या अर्थाने लढाईत रंगत आली आहे.

आकाराने जरी लहान असला तरीही विदर्भात महत्वाचा समजला जाणारा वर्धा लोकसभा मतदारसंघ…हा मतदारसंघ स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणारा ठरला आहे…1957 पासून ते 1971 पर्यंत सुरुवातीची तब्बल तीन टर्म प्रसिद्ध उद्योगपती कमलनयन बजाज यांनी काँग्रेसला या मतदारसंघात जम बसवून दिला…यापुढे वसंत साठे यांनी तीन वेळा काँग्रेसच्याच तिकिटावर वर्ध्याचं प्रतिनिधित्व केल्यानंतर 1991 ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाला आणि 1996 ला भाजपला काँग्रेसच्या बालेकिल्लात शिरण्याची पहिली संधी मिळाली…मात्र याने फारसा काही फरक पडलाच नाही…कारण यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसने हा मतदारसंघ घट्ट आवळून घेतला… दत्ता मेघे, प्रभा राव यांसारखे दिग्गज नेते वर्ध्यातून निवडून गेले…मात्र 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसच्या या पारंपारिक बालेकिल्लालाही तडे गेले…काँग्रेसचे माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांचा पराभव करत भाजपच्या रामदास तडस यांनी वर्ध्यात काँग्रेसला मोठा धक्का दिला…2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा रामदास तडस यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्या विरोधात 92 हजार 640 मतांची लीड घेत तब्बल दुसऱ्यांदा कमळाला जिल्ह्यात पाय घट्ट रोऊ दिले

Amar Kale भाजपच्या Ramdas Tadas यांची खासदारकी ची हॅट्रिक रोखणार? Sharad Pawar, Wardha Loksabha

कुणी काहीही म्हणलं तरी वर्ध्याच्या राजकारणाला जातीय समीकरणाची मोठी किनार आहे…इथल्या राजकारणाची दिशा मुख्यतः तेली समाज आणि कुणबी समाज या दोन समाजांच्या आजूबाजूने फिरताना दिसते… मावळत्या लोकसभेत चारुलता टोकस या कुणबी समाजाच्या होत्या…तर रामदास तडस हे तेली समाजाचे आहेत…वर्ध्यात कुणबी समाजाची संख्या सर्वाधिक आहे…त्याचबरोबर काही हजारांनी कमी एक तेली समाज दुसऱ्या स्थानावर आहे…त्यामुळे या दोन्ही समाजांच्या मतांच्या कौलावर वर्ध्याच्या खासदार ठरतो असे स्थानिक मंडळी सांगतात… मतदार संघातील पक्षीय बलबलाचा विचार करायचा झाला तर वर्ध्यात एकूण सहा विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहे…वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी हे तीन मतदार क्षेत्र भाजपच्या ताब्यात आहेत. देवळी मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा क्षेत्रात भाजप तर वरुड मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत… त्यामुळे एकंदरीत बेरीज करायची झाली तर चार आमदारांचं भक्कम पाठबळ भाजपकडे असल्याने मतदारसंघावर भाजपचा सध्या कमालीचा होल्ड आहे…

पण असं असलं तरी महायुतीत या जागेवरून प्रत्येकच पक्षाने काम करायला सुरुवात केली आहे…विद्यमान भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सोबतच शिवसेनेच्या उमेदवारीवर रामटेकमधून निवडून केंद्रीय मंत्री राहिलेले सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते अजित पवार गटात गेले. गेल्या सात वर्षांपासून वर्ध्यात मोहिते सक्रिय आहेत…आपल्यालाच या जागेवरून महायुतीकडून तिकीट मिळावं यासाठी ते प्रयत्न करतायेत…तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून गेल्या काही दिवसात माजी मंत्री सुनील केदार, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शिरीष गोडे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, आमदार रणजित कांबळे यांची नावं चर्चेत होती…मात्र मागील दोन निवडणुकांमधला पराभव, जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला जुळून यावा म्हणून काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे बोललं जातंय……

मागील दहा वर्षांपासून सत्तेत असल्यानं भाजपचा मतदारसंघात केलेल्या कामांचा प्रचार करण्यावर जास्त फोकस असेल एवढं मात्र नक्की…निम्न वर्धा सिंचन प्रकल्प, वर्धा- नांदेड रेल्वे मार्ग, लोकसभा क्षेत्रात तालुक्यांना जोडणारे रस्ते, महामार्ग, उड्डाण पूल यांचा प्रचारात पुरेपूर वापर केला जाईल…तर दुसरीकडे विरोधकांनाही सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी अनेक गोष्टींची मदत होऊ शकते…यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्यात असणारा बेरोजगारीचा प्रश्न…आजच्या स्थितीला बोटावर मोजण्याइतके उद्योग सोडले तर जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही…आजणसरा बॅरेज प्रकल्प अजूनही प्रलंबितच आहे…कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या यावर विरोधक तुटून पडू शकतात…

2019 च्या निवडणुकीचा या मतदारसंघातील सेंटर पॉइंट होता तो म्हणजे तेली वर्सेस कुणबी हा वाद…वर्ध्यात भाजपची उमेदवारी कुणबी समाजाचे उमेदवार सागर मेघे यांना दिली जाण्याची चाहूल लागताच तेली समजाचे नेतृत्व करणारे भाजपा खासदार रामदास तडस यांनाच उमेदवारी मिळावी याकरिता तेली समाजाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला खासदार रामदास तडस स्वत: उपस्थित होते. त्यावेळी भाजपाने तडस यांना उमेदवारी नाकारल्यास मेघे पिता पुत्राचे पुतळे जाळण्याचं आवाहन करण्यात आलं. आणि इथूनच सुरु झाला जिल्ह्यात तेली -कुणबी वाद. भाजपाने तेली समजाचे नेतृत्व करणारे रामदास तडस यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने कुणबी समाजाच्या चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली. हा जातीय वाद निवडणुकीदरम्यान मेसेजद्वारेही दिसला. तेली समाजाकडून तडस यांना मतदान करण्याचे आवाहन करण्याचा संदेश सोशल मीडियावर झळकले… यात कुणबी समाजावर टीका करण्यात आली. या संदेशाला उत्तर देत कुणबी समाजानेही मेसेज वॉर सुरु केलं…एकूणच काय तर 2019 च्या निवडणुकीला विकासापेक्षा जातीय राजकारणाचा जास्त कड होता…त्यामुळे यंदाची वर्ध्याची निवडणूक जातीपातीच्या राजकारणावरच फिक्स होणार का? भाजपचे रामदास तडस विजयाची हॅट्रिक करणार का? कि पवारांच्या तुतारीवरून अमर काळे विजय मिळवणार हे पाहायला हवं.