आम्ही इमानदारीने लढलो, तुम्ही बेईमानीने जिंकलात; संजय राऊतांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्यानंतर मंगळवारी उद्धव ठाकरे गटाकडून महा पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, “आम्ही ही लढाई इमानदारीने लढलो, मात्र तुम्ही बेईमानीने जिंकलात” अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “कर नाही त्याला डर कशाला हवे असे राज्याचे मिंदे मुख्यमंत्री दाढीला पिळ देत सांगत असतात. बरोबर आहे, त्यामुळेच कर नाही, डर नाही. त्यामुळेच जनता न्यायालय घेण्याची हिंमत आम्ही दाखवली आहे. आमच्यामध्ये हिंमत आहे. आमच्याकडून काहीच चुकीचसमोर आमच्या वकिलांनी आणि नेत्यांनी उत्तम लढा दिला. इमानदारीने लढलो. तुम्ही बेईमानाने जिंकलात”

तसेच, “बाळासाहेबांची शिवसेना या लवादानं कोणताही पुढचा-मागचा विचार न करता शिंदे गटाच्या हातात दिली, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र खदखदतोय. लवादाचा निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही. आजचा दिवस इतिहासात नोंदला जाणार आहे, आज न्यायाधीशाच्या भूमिकेत महाराष्ट्राची जनता आहे. मला खात्री आहे या न्यायालयात जनता जो निकाल देईल तोच निकाल लोकसभा आणि विधानसभेत मिळाल्या शिवाय राहणार नाही” असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना, “न्यायालय एक व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आली आहे हे वास्तव आपल्याला विसरुन चालणार नाही. पक्षांतर कसं करायचं याबद्दलची बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे बघायला हवं” असे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी आमदार अपात्र निकालासंदर्भात म्हटले आहे.