…. तर आम्ही भाजपसोबत सुद्धा जाऊ शकतो; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने महाविकास आघाडीत खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजपविरोधी महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा समावेश झाला आहे. मात्र जागावाटपाचा तेढ अजूनही कायम असून प्रकाश आंबेडकर सुद्धा महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनाच इशारा देताना आपण बघितलं आहे. आधी त्यांनी फुटलेल्या पक्षाने आधी त्यांची ताकद पाहावी असं म्हणत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आता तर त्यांनी आम्ही थेट भाजपसोबत सुद्धा जाऊ शकतो असं विधान करत महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्हाला असं वाटतं की, देशात जी जातीवर आधारित पुरोहितशाही चालली आहे ती कायद्याने पूर्णपणे बंद करायला हवी. यावर सरकारने बंदी घालायला हवी. त्यासाठी हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी (ब्रह्मज्ञान) उभं केलं जावं आणि तिथून शिकून, उत्तीर्ण होऊन जो पुरोहित बाहेर पडेल, जो पुजारी बाहेर पडेल त्यालाच या देशात धार्मिक विधी करण्याचा अधिकार असला पाहिजे. धार्मिक विधी त्याच्यामार्फतच केले जायला हवेत. आरएसएस आणि भाजपा जर असा कायदा आणि सुधारणा आणण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार करू शकतो. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने चर्चाना उधाण आलं आहे.

दरम्यान, यापूर्वी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. काल सुद्धा त्यांनी म्हंटल होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर ६ जागा जिंकू शकेल त्यामुळे फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी . आघाडी न झाल्यास लोकसभेच्या 46 जागांवर आपले उमेदवार उभे करण्यास वंचित तयार आहे असेही त्यांनी म्हंटल. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने राज्यातल्या ४८ पैकी २७ जागांवर आमची ताकद असल्याचं पत्र मविआ नेत्यांना दिलं होतं. त्यामुळे वंचितच्या मविआ प्रवेशाबाबत अनेकांच्या मनात साशंकता आहे.