Wednesday, October 5, 2022

Buy now

भाजपचे मिशन बारामती, 2024 ला गड सर करणारच; राम शिंदेंना विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला जसे अमेठीचा गड सर केला त्याचप्रमाणे 2024 ला बारामती जिंकणार असा निर्धार भाजप नेते राम शिंदेंनी केला आहे. बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे. त्यामुळे बारामतीचा गड सर करणार असं राम शिंदे म्हणाले. भाजपनं राम शिंदे यांच्याकडे बारामतीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे.

भाजपचे केंद्रातील मंत्री बारामतीला येणार आहेत. त्याच दौऱ्याच्या नियोजनासाठी इंदापूरच्या अर्बन बँकेच्या सभागृहात प्रभारी राम शिंदे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली, यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राम शिंदे म्हणाले, राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ शोधला होता. आता सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा ‘वायनाड’ शोधावा. ए ऑफ अमेठी मिशन सक्सेस झालं, आता बी फॉर बारामतीचं मिशन आम्हाला साध्य करायचं आहे. त्यासाठी आता 2024 ला कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर येणार आहेत. 22ते 24 सप्टेंबर दरम्यान त्या बारामतीला येऊन व्यूव्हरचना आखतील. त्यातील एक दिवस इंदापूरला मुक्कामी येणार आहेत. यावेळी दापुरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षकांची बैठक, शेतकरी मेळावा आणि भिगवणमध्येही महिला मेळावा घेण्यात येणार आहे.