Weather Maharashtra : राज्यात वातावरणात अचानक बदल झाला असून, पावसाने आपल्या दमदार आगमनाने कोकण, पुणे, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अनपेक्षित अवकाळी पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे.
कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह हजेरी
कोल्हापुरात दुपारनंतर पावसाने विजांच्या कडकडाटांसह हजेरी लावली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातल्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. जवळपास १-२ तास गडगडाटी पावसाच्या मोठ्या सरी जिल्ह्यात (Weather Maharashtra) बरसल्या.
पुण्यात होर्डिंग कोसळल्याने खळबळ
पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर आकाश ढगांनी आच्छादले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाघोलीजवळ सणसवाडी येथे एक भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली ७ ते ८ दुचाक्या अडकल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने कुठलाही जीवितहानी झाली (Weather Maharashtra) नाही. विमानतळ परिसरात टर्मिनलवर पाणी साचल्याने प्रवाशांचीही तारांबळ उडाली.
कोकणात पावसाचा कहर, वाऱ्याचा वेग ५० किमी
तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी भागांत जोरदार वळवाचे पाऊस सुरू आहेत. विजांच्या कडकडाटासह ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून, आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. विजेमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती आहे.
सोलापुरात हंगामी पावसाने दिलासा
सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये हंगामातील पहिल्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतातील कोरडवाहू पीकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः उस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटलेला दिसतोय.
जालन्यात लग्न मंडप उडाला, येलो अलर्ट कायम
जालना जिल्ह्यात पाचव्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. राजुर रोडवरील एका मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यादरम्यान वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने थोडी धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. येत्या ३ दिवसांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
जामनेरमध्ये वीज कोसळून ४ म्हशी ठार
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुनासगाव येथे वीज कोसळल्याने शेतकरी गोपाल इंधाते यांच्या चार म्हशी जागीच ठार झाल्या. जीव लावून वाढवलेल्या या जनावरांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडून मदतीची मागणी केली आहे.
पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!
भारतीय हवामान विभागानुसार पुढील ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ढगाळ वातावरण, पावसाच्या सरी व वीजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.