आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडलं काय? अजित पवारांचा रोखठोक सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत आपल्या आमदारांसोबत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्यावर अनेकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी एक महत्वाचे वक्तव्यं केले आहे. “आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडले काय? आपली कामे होत आहेत. जे सर्वजण आपल्यासोबत आले, ते सगळे खूश आहेत” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

रविवारी अजित पवार यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेबसाईटच्या उद्घाटनात हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, “पूर्वी शिवसेना कुठे होती, फक्त मुंबापुरी पूरती होती. मुंबईतून कोकणात वाढली मग महाराष्ट्रात वाढली. त्यांची जशी जिद्द तशी आपली देखील आहे” असे अजित पवार यांनी म्हटले.

पुढे बोलताना, ”छगन भुजबळ पहिल्या फळीचे नेते होते, आम्ही दुसऱ्या फळीचे नेते होतो. पक्षाची पहिली सभा अतिशय भव्य दिव्य अशी पार पडली. आम्ही अनेकांनी सगळी पदे भोगली, पण मुंबईत पक्ष ज्या पद्धतीने वाढायला हवा होता तो वाढला नाही. आमचं लक्ष ग्रामीण भागात होतं. गृहखाते आपल्याकडे होतं पण आम्ही कमी पडलो. पण आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. बहुजनांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे.” असे वक्तव्यं अजित पवारांनी केले.

दरम्यान, “आगामी निवडणुकांसाठी आपण काम करणार आहोत. आपल्या आपल्या भागात निवडणुन येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे रहायला हवं. वंचीत बहुजन यांच्या करिता आपण काय करत आहोत, ते आपल्याला दाखवायचं आहे. तीन पक्षांची विचारधारा वेगळी असली तरी जगात नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मोठी आहे.” अशा शब्दात अजित पवारांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.