Navratri 2023 : नवरात्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे इतिहास? चला जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दुर्गा देवीचा जागर करणाऱ्या नवरात्र उत्सवाला (Navratri 2023) 15 ऑक्टोंबरपासून सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्रीच्या काळात तब्बल 9 दिवस दुर्गादेवीच्या 9 अवतारांची पूजा केली जाते. असे म्हणतात की, नवरात्रीच्या काळात स्वतः दुर्गा देवी राक्षसांचा संहार करण्यास 9 रूप धारण करते. मुख्य म्हणजे, नवरात्र उत्सव साजरी करण्यामागे मोठा इतिहास आणि अनेक वेगवेगळया पौराणिक कथा आहेत. तसेच, नवरात्र उत्सव हा आजवर चालत आलेली एक परंपरा आहे. आज आपण याच इतिहासाविषयी आणि दुर्गा देवीच्या 9 अवतारांविषयी जाणून घेणार आहोत.

नवरात्र उत्सव इतिहास

नवरात्र उत्सवाचा काळ अतिशय पवित्र मानला जातो. या 9 दिवसाच्या काळात आपण दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करतो. या पूजेशी संबंधित अनेक पौराणिक कथा आजवर प्रसिद्ध झाल्या आहेत. आज आपण यातीलच एका लोकप्रिय पौराणिक कथेची माहिती जाणून घेणार आहोत. पौराणिक कथेनुसार, महिषासुर राक्षसाला भगवान ब्रह्मदेवाकडून अमरत्व प्राप्त झाले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू मनुष्य, राक्षस किंवा देव यांच्यामुळे होऊ शकत नव्हता. महिषासुरने आपल्याला वरदान प्राप्त झाल्यानंतर सगळीकडे विनाश करण्यास सुरूवात केली. तसेच, लोकांचा आणि देवांचा छळ सुरू केला.

महिषासुरने सुरू केलेल्या या विनाशाला थांबवण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आदिशक्तीला आवाहन केले. त्यानंतर, महिषासुराचा वध करण्यासाठी देवी दुर्गाचा जन्म झाला. त्यामुळे तिचे नाव महिषासुर मर्दिनी असे पडले. पुढे, देवी देवतांकडून महिषासुर मर्दिनी देवीला शस्त्रांचे आणि शक्तीचे बळ देण्यात आले. हे बळ मिळताच देवीने महिषासुराशी युद्ध पुकारले. महिषासुर आणि देवीचे हे युद्ध तब्बल 9 दिवस चालले. अखेर 10 व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. तेव्हापासून ते आजवर 9 दिवस नवरात्रोत्सव साजरी केला जातो. या 9 दिवसात आपल्याला देवीच्या 9 रूपांचे दर्शन घडते. आपण 9 दिवस देवीच्या 9 रुपांना पुजतो.

दुर्गा देवीचे 9 अवतार

नवरात्रीच्या काळात माता दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. शैलपुत्री हा माता दुर्गेचा पहिला अवतार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी शैलपुत्री हिची पूजा करण्यात येते. यानंतर, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा, पाचव्या दिवशी देवी स्कंदमाता, सहाव्या दिवशी देवी कात्यायनी, सातव्या दिवशी देवी कालरात्री, आठव्या दिवशी देवी महागौरी आणि नवव्या देवी सिद्धिदात्री या 9 अवतारांची पूजा केली जाते.

नवरात्रीचे महत्व

शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अश्विन महिन्यापासून शरद ऋतूची सुरुवात होते, म्हणूनच याला शारदीय नवरात्री म्हणतात. हा उत्सव देवी दुर्गेच्या 9 रूपांना समर्पित आहे. या काळात देवी दुर्गेची उपासना आणि उपवास केल्याने साधकाच्या सर्व चिंता आणि समस्या दूर होतात.