रब्बी कांद्याची काढणी सध्या जोरात सुरू आहे, आणि यावेळी कांद्याची टिकवणक्षमता खूप चांगली असते. त्यामुळे अनेक शेतकरी बाजारभाव कमी असताना कांदा विकण्याऐवजी चाळीत साठवण्याचे पसंत करतात. पण, जर योग्य पद्धतीने कांदा साठवला नाही, तर तो लवकर खराब होऊ शकतो, आणि शेतकऱ्यांना मोठा तोटा होऊ शकतो. म्हणूनच, काढणीपासून ते साठवणूकपर्यंत प्रत्येक टप्प्यावर योग्य काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. साधारणपणे रोप लागवडीपासून 110 ते 140 दिवसांनंतर कांदा काढणीसाठी तयार होतो. परंतु, तो कधी काढावा आणि कसा साठवावा, याचे 4 सोपे, पण अत्यंत महत्त्वाचे उपाय जाणून घेऊया
कांदा काढणी करण्याचा योग्य वेळ
कांदा पूर्णपणे वाढल्यानंतर नवीन पानांची वाढ थांबते आणि पाती पिवळट होऊन वाकतात. या स्थितीला “मान पडणे” असं म्हणतात. पिकाच्या सुमारे 50% कांद्याच्या पातींमध्ये हा बदल दिसल्यास, कांदा काढणीसाठी तयार आहे.
कांदा साठवताना पाळा हे 4 सोपे उपाय
सूर्यप्रकाशात कांद्याचे वाळवणे
कांदा काढल्यानंतर तो 3 ते 5 दिवस उन्हात वाळवा. यामुळे कांद्याचे जीवनसत्त्व अधिक विकसित होतात, आणि तो जास्त काळ टिकतो. मात्र, कांद्याचे मोठे ढीग न करता तो जमिनीवर एकसमान पसरवला पाहिजे.
कांद्याच्या पातींची योग्य कापणी
वाळलेल्या कांद्याच्या पातीला 1 ते 1.5 इंचाच्या अंतरावर कापा. यामुळे कांद्याच्या आतील भागाचं संरक्षण होतं, आणि ओलाव्यामुळे होणारा नुकसान टाळता येतो.
सावलीत कांद्याचे वाळवण
सावलीत वाळवलेला कांदा जास्त काळ टिकतो. यामुळे कांद्याच्या बाहेरच्या सालीतील आर्द्रता कमी होऊन, कांदा अधिक सुरक्षित होतो. तसेच, कांदा सडण्याचा धोका कमी होतो आणि वजनही टिकते.
साठवण्यापूर्वी कांद्याची योग्य निवड
वाळलेल्या कांद्याची योग्य निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्यम आकाराचे कांदे (4.5 ते 7.5 सेंटीमीटर व्यास) निवडा. खूप मोठे, लहान, जोड कांदे, सडलेले किंवा मोड आलेले कांदे वेगळे करा.
साठवणीची योग्य पद्धत आणि काळजी घेतल्यास कांदा 5 ते 6 महिने ताजा राहू शकतो. त्याचबरोबर, बाजारभाव वाढल्यावर विक्री केल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल. योग्य काळजी घेतल्यास, शेतकऱ्यांना कांद्याचे चांगले उत्पादन मिळवता येईल आणि आर्थिक फायदाही होईल.