राज्यात 1 जून नंतर काय असेल लॉकडाऊनची स्थिती ? ‘या’ मंत्र्यांनी दिले महत्वाचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने झाला आहे. महाराष्ट्र राज्यात ही संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत एक जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु आता महाराष्ट्रातील कोरोनारुग्ण संख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. त्यामुळे आता एक जून नंतर ही लॉकडाऊन वाढणार की निर्बंध हटविले जाणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी लॉकडाऊन बाबत काही सूतोवाच दिले आहेत.

लॉकडाऊन बाबत मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं की, करोना रुग्ण संख्या कमी असणारे आणि मृतांचा आकडा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये एक जून नंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येण्याची शक्यता आहे. निर्बंध जरी शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाच वेळी शिथिल होणार नाहीत. तर टप्प्याटप्प्याने या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर असे या संदर्भातील महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील लॉकडाऊन संदर्भात बोलताना महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोन मधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन एक जून नंतर शिथिल होण्याची शक्यता असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं. तसंच राज्यातील 14 जिल्हे रेड झोन मध्ये आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाईल असेही वडेट्टीवार यांनी सांगितले होते. रेड झोन मधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आठवडाभर आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोन मधील जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार आहेत असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

रेड झोन मध्ये या जिल्ह्यांचा समावेश

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन नंतर देखील रुग्ण संख्या कमी झालेली दिसत नाही याच पार्श्वभूमीवर नुकतेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 15 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची बैठक बोलवली होती. बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद,अहमदनगर ,धाराशिव जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्ण संख्या कमी होत नसल्याची माहिती आहे.

Leave a Comment