मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा सत्ताधारी शिवसेना शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी कधी देणार ?

mns
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली उद्या शहरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. महागाईच्या विरोधात मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेने शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी कधी देणार? पाणी पुरवठा योजना कधी पुर्ण होणार, औरंगाबादचे संभाजीनगर कधी करून दाखवणार? असे सवाल करत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या आक्रोश मोर्चावर टीका केली आहे.

यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष दाशरथे म्हणाले, गेल्या २५ वर्षापासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, पण यांना अजूनही शहरवासियांना चोवीस तास पाणी देता आले नाही. राज्यातील कुठल्याही मोठ्या शहरापेक्षा इथे पाणीपट्टी जास्त आहे. पाणी पट्टी ३६५ दिवसांची आणि पाणी मात्र फक्त ६० दिवस, मग या अन्यायावर कोण बोलणार? शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारने दोनशे-अडीशे कोटी दिले, तरी रस्त्यांची अवस्था वाईटच आहे. शहरांतर्गत टोल नाके कुणाच्या हितासाठी सुरू आहेत? याचे उत्तर देखील शिवसेनेच्या नेत्यांनी द्यावे, असे आवानह दाशरथे यांनी केले. पेट्रोल-डिझेलच्या करात केंद्रातील सरकारने कपात केली, देशातील इतर राज्यांनी देखील आपला कर कमी करून आपल्या जनतेला दिलासा दिला. पण महाराष्ट्रातील आघाडी सरकार एक रुपयांचा कर कमी करायला तयार नाही.

शेतकऱ्यांची अवस्था देखील तशीच आहे. पीक विम्याची रक्कम केंद्रातील सरकारने भरली, पण राज्याने अद्याप आपला वाटा भरला नाही, त्यामुळे अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसून देखील राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकलेला नाही, याला जबादार कोण? हे देखील मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांनी पहावे, असा टोला देखील मनसेने संजय राऊत यांना लगावला. आपल ठेवाव झाकून आणि दुसऱ्याच पहावं वाकून अशी शिवसेनेची गत झाली असून आम्ही त्यांचा निषेध करतो, असेही दाशरथे म्हणाले.