मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी विरोधकांकडून संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आज याच प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन व्हिप निघाले आहेत. एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या मोहम्मद फझल यांनी व्हिप काढला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही खासदार मोदी सरकारच्या विरोधात की बाजूने मतदान करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच राष्ट्रवादीतूनच दोन व्हिप निघाल्यामुळे याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादीचे लोकसभेत पाच खासदार आहेत. त्यातील चार खासदार महाराष्ट्रातले तर एक खासदार लक्षद्विपचे आहेत. शरद पवार गटात, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फजल असे सर्व खासदार आहेत. तर सुनील तटकरे अजित पवार गटाच्या बाजूने आहेत. यामध्ये सुनील तटकरे यांनी काढलेल्या व्हिपमध्ये मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये अविश्वास ठरावाला विरोध करण्यास देखील सांगितले आहे.

मात्र दुसऱ्या बाजूला मोहम्मद फजल यांनी काढलेल्या व्हिपमध्ये मोदी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षांकडून कोणत्या व्हिपला अधिकृत व्हिप म्हणून मान्यता देण्यात येतील यावर पुढील कारवाई ठरवण्यात येईल. मुख्य म्हणजे, व्हिपचं उल्लंघन करणे पक्षांतर बंदीच्या कायद्यातील गंभीर गुन्हा मानला जातो. तसेच यातून पळवाट काढल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येते. जर एखाद्या खासदाराला मतदान टाळायचे असल्यास तो गैरहजेरी किंवा सभात्याग यातील एक पर्याय निवडू शकतो. त्यामुळे दोन्ही गटातील खासदार नक्की पर्याय निवडतील की मतदान करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देणार आहेत. गेल्या ८ ऑगस्ट पासून लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू करण्यात आली आहे. याबाबत ९ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तातावर बेधडक भाषण करत मोदी सरकारवर मणिपूर हिंसाचारासंदर्भात जोरदार टीका केली. यावर उत्तर देत गृहमंत्री अमित शाह मोदींच्या बाजूने युक्तिवाद मांडला. त्यानंतर आज पंतप्रधान मोदीच अविश्वास प्रस्तावावरील चर्चांना उत्तर देणार आहेत.