हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला जाळ अन् धूर संगटच निघलेल्या माढा लोकसभेचा निकाल लागला.. अकलूजच्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा भाजपसारख्या बड्या पक्षाला आणि त्यांच्या मतदारसंघातील आमदारांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या नादाला लागायचं नाय… भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींपासून फडणवीसांनी ताकद लावूनही सव्वा लाखांच्या लीडने अखेर मोहिते पाटलांनी विरोधकांना कानठाळ्या बसतील असा तुतारीचा आवाज काढला.. लोकसभा आटोपली.. आता वेल आलीये विधानसभेची.. तेव्हा सगळ्यांच्याच नजरा पुन्हा वळल्यात त्या माढ्याकडे.. माढ्याचे विद्यमान खासदार आहेत बबनदादा शिंदे.. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असणारे बबनदादा इथले सलग सहा टर्मचे आमदार.. पण याच माढ्यात प्रस्थापित असणाऱ्या बबनदादांची आमदारकी आता धोक्यात आलीय… मोहिते पाटलांनी लोकसभेला दणक्यात मिळवलेला विजय हे त्यामागचं प्रमुख कारण… पण बबनदादा शिंदे (Baban Shinde) खरंच आमदारकीसाठी इच्छुक आहेत का? जर त्यांनी निवडणुक लढवली तर त्यांच्या विरोधात कुठला उमेदवार रिंगणात असेल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटील फॅक्टर माढा विधानसभा मतदारसंघात खरंच निर्णायक ठरु शकतो का? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
माढा विधानसभा मतदारसंघ.. इथं राजकारण चालतं ते फक्त बबनदादांचं.. बबनदादा शिंदे, सलग सहा टर्म माढ्यातून आमदार म्हणून निवडुन येतायत… साखर कारखाने, बँका, बाजार समित्या, जिल्ह्या दुध संघ यावर बबनदादा शिंदे यांचे वर्चस्व राहीलंय… तालुक्यात असणारा तगडा आणि दांडगा जनसंपर्काला त्यांनी कधीच नख लागू दिला नाही.. आपल्या विरोधात विरोधकच असता कामा नये, आणि असला तरी तो टीकू नये यासाठी बबनदादांची यंत्रणा एक्टीव्ह असायची… सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत असणारे बबनदादा जिल्ह्यावरही आपला दबाव ठेवून आहेत… पण त्यांच्या या वर्चस्वाला धक्का लागला तो लोकसभा निवडणुकीत.. माढा विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मोठं लीडं मिळेल.. यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या शिंदेंना मोठा धक्का बसला.. बबनदादांच्या एकट्या मतदारसंघातून तुतारीला तब्बल ५२ हजारांचं मताधिक्य मिळालं.. ही बाब अर्थात बबनदादांसाठी येणाऱ्या विधानसभेला धोक्याची घंटा असल्याचंच दाखवून देणार आहे… लोकसभेपेक्षा आमदारकीचे अस्पेक्ट वेगळे असतात याचा विचार केला तरी जनमत विरोधात आहे हा मॅसेज देखील विधानसभेचा निकाल फिरवू शकतो, हे राजकारण कोळून पिलेल्या माणासाला सांगायला नको.. आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे बबनदादा निवडणूक लढणार का?
कारण सध्या माढ्यातील राजकीय उठबस पाहिली तर बबनदादा शिंदे हे येणाऱ्या विधानसभेला आपले सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना मैदानात उतरवण्याच्या फुल तयारीत आहेत. म्हणूनच शिंदे दररोज तालुक्यातील विविध गावांना गाठी भेटी देतायत… लहान मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावतायत.. त्यामुळे त्यांचं महायुतीकडून आमदारकीचं तिकीट फिक्स समजलं जातंय.. अपवाद फक्त एकच तो म्हणजे सावंत बंधूंचा.. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांचंही जिल्ह्यावर वर्चस्व आहे.. त्यांचे साखर कारखाने, बँका, शिक्षणसंस्था आहेत. ते सध्या शिवसेना शिंदे गटात असल्यानं त्यांनी आमदारकीची मागणी लावून धरली तर भांड्याला भांड लागू शकतं.. पण सध्यातरी बबन शिंदे किंवा त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांपैकी एकाला महायुतीकडून आमदारकीची उमेदवारी मिळेल, असं चित्र आहे.. आता राहता राहीला प्रश्न की यांच्या विरोधात कोण?
तर त्यासाठीही एक नाव एका भेटीमुळे चर्चेत आलंय.. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुन माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यानं त्यांच्या नावाची चाचपणी माढ्याच्या उमेदवारीसाठी केली जात असल्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा आहे… . पण ही भेट सदिच्छ भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिनल साठे यांनी दिली. मात्र, या भेटीमागे विविध राजकीय तर्क काढले जात आहेत. माढ्यातील साठे कुटुंब हे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब मानलं जातं. मध्यंतरी काही काळ साखर कारखाना अडचणीत असल्यामुळं साठे कुटुंबाने भापमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पुन्हा त्यांनी घरवापसी केलीय.. पण माढ्यातून पवार फॅक्टर चालत असल्याने मिनल साठे हातात तुतारी घेऊन इथली लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी करण्याची शक्यता दाट आहे… शरद पवारांच्या सहानुभुतीचा फॅक्टर, साठे कुटूंबाची ताकद आणि त्याला मोहिते पाटलांचं मिळणारं बळ या सगळ्यांची बेरीज करुन पाहिली तर इथं शिंदे पितापुत्रांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो…
तसा माढा मतदारसंघातील मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातला राजकीय संघर्ष तसा जुनाच.. सोलापुर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेपासून ते बॅंकापर्यंत या दोन गटात तुंबळ वाद पाहायला मिळतो.. मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह देण्याचा बबन शिंदेंचा नेहमीच प्रयत्न राहीलाय.. आता त्याचाच वचपा काढायची आयती संधी मोहिते पाटलांसाठी विधानसभेच्या निमित्ताने चालून आलीय… बबन शिंदे वयोमानाचा विचार करता निवडणुकीत उतरणार नसले तरी त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे याला घेरण्याचा मोहिते पाटील नक्कीच प्रयत्न करतील.. माळशीरस तालुक्यातील १४ गावं आणि पंढरपुरातील ४१ गावं ही शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणारी आहेत.. कारण तिथं मोहिते पाटलांचा हुकुमी एक्का चालत असल्यानं आणि त्यातही शरद पवारांनी इथँ जुळवून आणलेलं जातीय समीकरण शिंदेंच्या विरोधात जाणार असल्यानं माढ्यात बबनदादा शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागणार, असं म्हणायला फुस स्कोप आहे.. आता चहुबाजूंनी वादळात सापडलेल्या या आपल्या शिलेदाराला अजितदादा किती आणि कशी ताकद देणार? हा ही मोठा प्रश्नच आहे… बाकी महाविकास आघाडी माढ्यातून कुठला उमेदवार देईल.. त्याला कुठल्या चिन्हावर निवडणुकीत उतरवेल.. यावरही पुढची बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत.. या सगळ्या विश्लेषणाचा विचार करता माढ्याचा यंदाचा आमदार कोण असेल? तुमचा कौल कुणाला जातोय.. आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.