Union Budget 2023 : देशात पहिल्यांदा अर्थसंकल्प कोणी सादर केला होता?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करतील. अर्थमंत्री म्हणून संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याची त्यांची ही चौथी वेळ असेल. तसेच 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मानला जात आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 112 अंतर्गत केंद्र सरकारला आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी अर्थसंकल्प सादर करावा लागतो. केंद्रीय अर्थसंकल्पातून देशातील सर्वसामान्य जनता, छोटे व्यापारी, शेतकरी वर्गाला मोठ्या अपेक्षा असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की देशाचे पहिले बजेट कोणी सादर केलं? चला तर मग जाणून घेऊया नेमकी कोण होती ती व्यक्ती…

खरं तर भारतातील आधुनिक अर्थसंकल्प प्रणाली 7 एप्रिल 1860 रोजी सुरू झाली. त्यावेळी देशावर इंग्रजांचे राज्य होते. 1857 च्या क्रांतीनंतर, भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडे गेला. ब्रिटीश सरकारने व्हाईसरॉयच्या माध्यमातून भारतावर राज्य केले. व्हाईसरॉयची एक सल्लागार परिषद होती जिच्या सल्ल्याने ते निर्णय घेत असत. त्यावेळी जेम्स विल्सन हे आर्थिक बाबी पाहणारे या परिषदेचे सदस्य होते. ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठीच त्यांना भारतात पाठवण्यात आले होते. जेम्स विल्सन यांना अर्थमंत्री पदाचा दर्जा नव्हता पण त्यांनीच 7 एप्रिल 1860 रोजी अर्थसंकल्पीय भाषण केले आणि प्रथमच ‘इंग्लिश मॉडेल’वर भारताचा अर्थसंकल्प सादर केला.

देशात Income Tax जेम्स विल्सन यांनीच सुरु केला –

कदाचित तुम्हाला माहित नसेल परंतु देशात इन्कम टॅक्स लागू करण्याचे श्रेय जेम्स विल्सन यांना जाते. त्याकाळी इन्कम टॅक्स लागू केल्याने देशात मोठा वाद झाला होता. कारण देशातील मोठमोठे जमीनदार आणि श्रीमंत व्यापारी वर्गाला यामुळे काही प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागलं. मात्र ब्रिटीश राजवटीत भारतीयांना सुरक्षित वातावरण दिले जात आहे, त्यामुळे त्या बदल्यात हा कर म्हणजे एक छोटीशी फी आहे, असे त्यांनी त्यावेळी सांगितलं होते.

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा पहिला अर्थसंकल्प कधी आणि कोणी मांडला तर त्याचे तो दिवस होता २६ नोव्हेंबर १९४७, जेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय विधेयक आर के षण्मुखम चेट्टी यांनी मांडले होते. आरके षण्मुखम हे त्यावेळी भारताचे अर्थमंत्री होते. देश नुकताच स्वतंत्र झाल्याने तो अर्थसंकल्प म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा एकप्रकारे आढावा होता. त्यामध्ये आजच्या सारख्या सर्वच क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद नव्हती.