महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण?? समोर आले मोठे अपडेट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) लोकसभेला दमदार यश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडी लागली आहे. येत्या ३ महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून निवडणूक आयोग कधीही या तारखा जाहीर करू शकते. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येत्या २० ऑगस्टला महाविकास आघाडीची मुंबईत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत हि बैठक होणार असून आगामी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा यावर या बैठकीत चर्चा होईल.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी याबाबत माहिती दिली आहे. २० ऑगस्ट रोजी स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती आहे. त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मुंबईत येणार असुन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील. कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या आणि मुख्यमंत्री कोण असेल याबाबत या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होऊ शकते. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवली त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही एकत्र लढू आणि यश मिळवू असा विश्वास चेन्निथला यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्षपणे सुचवलं आहे. या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम बघितलं आहे. लोकसभेतील अनेक घटकांचे मतदान उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे बघूनच झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद महत्व्वाची आहेच मात्र बिन चेहऱ्याचे सरकार अजिबात चालणार नाही असं राऊतांनी सांगितलं. संजय राऊतांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदासाठी समोर केलं होते. तर राऊतांच्या या विधानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.