हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला यशाची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीआधीच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभेच्या निकालानंतरच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपद जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे ३ प्रमुख पक्ष आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. यामध्ये तिन्ही पक्ष प्रत्येकी 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये जागावाटपाचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता राहिलाय प्रश्न तो म्हणजे फक्त काँग्रेसचा …त्यामुळे काँग्रेसला हा फॉर्म्युला मान्य असेल का ते पाहायला हवं. तसेच विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार नाही. निकालानंतरच मुख्यमंत्रीपद जाहीर केले जाणार आहे.
दरम्यान, तत्पूर्वी तिन्ही पक्ष सर्वच्या सर्व २८८ जागांची चाचपणी पण करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कि, आम्ही 288 जागांचा ॲक्सेसमेंट करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस देखील 288 जागांवर चाचपणी करत आहे आणि काँग्रेस पक्ष सुद्धा 288 जागांची चाचपणी करतोय. तिघांचाही हा अभ्यास पूर्ण झाल्यावर आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू, की कोणत्या पक्षाने किती जागा लढवाव्या आणि कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवार उभं करावे. मात्र सध्या तरी जो जिंकेल त्याची जागा असं महाविकास आघाडीचं सूत्र आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली.