भाजपचा बालेकिल्ला चिंचवड विधानसभेत इच्छुकांमुळे बंडाळीची शक्यता

chinhwad assembly election 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसब्याने मारलं पण चिंचवडने तारलं… पुण्यातल्या पोटनिवडणुकीतला हा कित्ता आपल्याला माहित असेल… अश्विनी जगताप आमदार झाल्या… आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की चिंचवड म्हटलं की फक्त भाजपच… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेलाही चिंचवडनेच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना पडता पडता वाचवलय… त्यामुळे हे तर फिक्सय की महाराष्ट्राचं वारं पलटो ना पलटो… पण चिंचवडमध्ये महायुतीचाच आमदार डोळे झाकून निवडून येतोय… पण यात प्रॉब्लेम असा झालाय की आमदारकी एका पावलावर दिसत असल्यानं महायुतीतील अनेक इच्छुकांनी नुसतं रान तापवलंय… यामुळे येणाऱ्या काळात नाराजी, फोडाफोडी, कोलांट्या उड्या आणि बंडाळी असं सगळं काही चिंचवड विधानसभेत पाहायला मिळू शकतं… पण खरंच येणाऱ्या विधानसभेला चिंचवड मधून कोणाला उमेदवारी मिळेल? बंडाळी कोण करेल? आणि या सगळ्यातून कोणता उमेदवार विजयाचा झेंडा हाती धरेल? चिंचवड विधानसभेच्या इतिहास ते वर्तमान व्हाया पोटनिवडणूक असा सारा काही राजकीय सारीपाट पाहूयात

जगताप, काटे, नखाते, कलाटे ही आडनाव आहेत महायुतीतील सध्या विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची… पण चिंचवड मधूनच महायुतीच्या बाजूने निवडणूक लढवण्यासाठी सगळीच राजकीय मंडळी इतकी इच्छुक का आहेत? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या आधी आपल्याला इतिहासात डोकवावं लागतं…. साल 2009 चं… लोकसभेच्या पुनर्रचनेनंतर या नव्या कोऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली… तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराचा मुख्य चेहरा असणारे लक्ष्मण जगताप यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली…कारण आघाडीत जागा काँग्रेसला सुटली… त्यामुळे काँग्रेसकडून उभे राहिलेल्या भाऊसाहेब भोईर यांना धोबीपछाड देत अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप हे आमदार झाले… यानंतर त्यांनी राजकारणात कधीच मागे वळून पाहिलं नाही… ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात म्हणजे राष्ट्रवादीत गेले…

2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली…. पण नंतर त्यांचं अनेक मुद्द्यांवरून पक्षासोबत बिनसलं… म्हणून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचं तिकीट नाकारत त्यांनी शेकाप मनसे गटातून उमेदवारी अर्ज भरला… निवडणूक लढवली… पण त्यांचा पराभव झाला… पण यानंतर राजकारणाचं वारं पाहून त्यांनी भाजपशी सलगी करत 2014 ची पक्षाकडून चिंचवडची उमेदवारी मिळवली… आणि निवडणूक जिंकली सुद्धा… 2019 लाही सगळं काही सेम टू सेम… फक्त युती झाल्यामुळे तिकीट न मिळालेले शिवसेनेचे राहुल कलाटे नाराज झाले… त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला… राष्ट्रवादीनं त्यांना पुरस्कृत केलं… अत्यंत काट्याने काटा काढावा अशा झालेल्या या अटीतटीच्या लढतीत अखेर लक्ष्मण जगतापांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली… आणि चिंचवडमध्ये राजकारणाचा नवा जगताप पॅटर्न अस्तित्वात आणला….

पण 3 जानेवारी 2023 रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांचं दुर्धर आजाराने निधन झालं… चिंचवडच्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली… तेव्हा काहीही झालं तरी भाजपचा हा गड जिंकणं पक्षासाठी महत्त्वाचा होता म्हणून जगतापांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली… तर महाविकास आघाडीने राहुल कलाटेंना डावलून नाना काटेंना उमेदवारी दिल्यामुळे कलाटे पुन्हा अपक्ष लढले… अत्यंत चुरशीच्या तिरंगी झालेल्या या पोटनिवडणुकीत अखेर अश्विनी जगताप यांनीच बाजी मारली… राहुल कलाटे यांनी घेतलेल्या मतांनी निकालाला कलाटणी मिळून आघाडीच्या नाना काटेंना इथं पराभवाचा धक्का बसला…

कट टू 2024. राष्ट्रवादीचे नाना काटे अजित दादांसोबत आहेत… राहुल कलाटे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्यांनी आपली राजकीय भूमिका अद्या स्पष्ट केली नाही… येनवेळी ते शरद पवार गटाची तुतारी हाती घेत निवडणूक रिंगणात दिसतील असं काही राजकीय विश्लेषक सांगतायेत… पण आता मुख्य मुद्दा येतो तो महायुतीचा… भाजपच्या अश्विनी जगताप या इथल्या विद्यमान आमदार… पोट निवडणुकीनंतर आता मुख्य विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केलीये… त्यामुळे भाजपातील इच्छुक उमेदवारांच्या पोटात मोठा गोळा आलाय… त्यात पहिलं नाव येतं ते दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचं… खरंतर पोटनिवडणुकीतच भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते.. पण उमेदवारी अश्विनी जगताप यांना जाहीर झाल्यानंतर नाराज शंकर जगताप काही तास नॉट रिचेबल देखील होते… पण पुन्हा त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती… त्यामुळे ते अगदी ठामपणे आपली उमेदवारी सध्या पक्ष श्रेष्ठींकडे मागतायेत… यासोबत शत्रुघ्न काटे आणि चंद्रकांत नखाते देखील उमेदवारीसाठी अडून बसलेत… या सगळ्यात तिकीट कुणाला द्यायचं? यावरून महायुतीत मोठे घासाघीस होऊ शकते… यातल्याच एका नाराज उमेदवाराला गळाला लावून शरद पवार चिंचवड मधून निवडणूक लढवतील, अशी सध्या तरी मतदारसंघाची स्थिती आहे…

बाकी या मतदारसंघाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर चिंचवड हा अनेक गावांचा मिळून तयार झालाय…. आयटीयन्स, उद्योजक, वाणिज्य व्यावसायिक असा मोठा वर्ग इथे राहतो…. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा असला तरी याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकं नोकरीसाठी इथं स्थलांतरित झालेत. म्हणूनच पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार अशी या मतदारसंघाची ओळखय… उत्तर भारतीयांची ही संख्या इथे लक्षणीय असल्यामुळे हा भाजपचा कोअर मतदार आहे…. एका शब्दात सांगायचं झालं… तर भाजप चिंचवड मधून डोळे झाकून निवडून येईल… पण अजितदादा भाजपसोबत आल्याने नाना काटे काय भूमिका घेणार? शंकर जगतापांची नाराजी भाजपला परवडणारी आहे का? राहुल कलाटे पवारांची तुतारी हाती घेऊन निवडणुकीला यंदा तरी कलाटणी देतील का? तुम्हाला काय वाटतं? चिंचवडचा पुढचा आमदार कोण? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा