2000 ची नोट बंद कशासाठी? नेमकं काय कारण ते स्पष्ट करा- अजितदादा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने काल पुन्हा एकदा नोटबंदी करत २००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद केल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन RBI ने केलं आहे. सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. 2000 ची नोट बंद करण्याचे नेमकं कारण काय हे RBI ने स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, मागच्या वेळी जेव्हा केंद्र सरकारने १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा बंद केल्या त्यावेळी जनतेला जो काही त्रास झाला तो त्रास जनतेने सहन केला. आता पुन्हा केंद्राने २००० च्या नोटा बंद केल्या आहे. आत्ता मे महिन्यात हा निर्णय घेण्यात आला असला तरी सप्टेंबर पर्यंत मुदत आहे. त्यामुळे लोकांना त्रास होईल असं वाटत नाही. परंतु या नोटा बंद का करण्यात आल्या याचे कारण आरबीआयने स्पष्ट करावे अशी मागणी अजित पवारांनी केली.
अनेक व्यवहार हे चेकने किंवा RTGS ने करावे लागतात. दैनंदिन जीवनात पैसे लागतात त्यावेळी आपल्याला ५०० आणि २०० रुपयांच्या नोटाच मिळतात. बँक वाल्याला जरी विचारलं तरी ते सांगतात कि २००० ची नोट नाही, आमच्याकडे सप्लाय होत नाही.. RBI च नोटांचा सप्लाय राष्ट्रीयकृत बँकांना करत असते, आणि नंतर त्या नोटा जिल्हा बँक आणि सहकारी बँकांना करत असते, तो सप्लाय का झाला नाही यापूर्वी असा सवालही अजित पवारांनी केला.