भुजबळांनी लोकसभा निवडणुकीत माघार का घेतली? ही कारणे चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमधून छगन भुजबळच (Chhagan Bhujbal) महायुतीचे उमेदवार असणार, हे दिल्लीतून पक्क झालं होतं. मात्र तीन आठवडे उलटले तरी देखील त्यांच्या नावावर कन्फर्मेशन काही येत नव्हतं. शिंदे गटाचे स्टॅंडिंग खासदार हेमंत गोडसे या जागेवर अडून बसल्याने नाशिकच्या जागेचा (Nashik Lok Sabha 2024) तिढा वाढला होता. महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला, तरी देखील युतीचा उमेदवार ठरत नसल्यानं हा वाद आणखी चिघळू नये म्हणून भुजबळांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आणि नाशिकच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला. पण भुजबळांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेणं…आणि मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) भुजबळांना उमेदवारी मिळाली तर स्टॅन्ड घेण्याची केलेली भाषा…याचा कनेक्ट लावून पाहिला तर भुजबळ मनोज जरांगेंना घाबरलेत, अशा काहीशा तिखट प्रतिक्रिया मराठा समाजातून व्यक्त होऊ लागल्यात…निवडणुकीतून माघार घेण्याची भुजबळांकडून अनेक कारणं सांगण्यात येत असली तरी या निर्णयाला जरांगे पाटील फॅक्टर कितपत कारणीभूत आहे? मराठ्यांना डिवचणं भुजबळांच्या अंगलट आलंय का? नाशिकच्या जागेवर उमेदवारीवरून महायुतीत घडलेल्या ए टू झेड घडलेल्या नाटकाची फुल टू कहाणी…

पहिल्या टप्प्यातील मतदानही झालं मात्र महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा काही सुटता सुटत नव्हता. शिंदे गटाचे स्टॅंडिंग खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी जोर लावला होता… मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर शक्ती प्रदर्शनापासून ते शिंदेंवर कार्यकर्त्यांच्या थ्रू दबाव आणत होते. तर दुसरीकडे छगन भुजबळच या जागेवरून घड्याळाच्या चिन्हावर लढणार, हे जवळपास कन्फर्म झालं होतं. नाशकात त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती. पण अधिकृत उमेदवारी काही केल्या भुजबळांच्या वाट्याला येत नव्हती.. तीन आठवडे उलटून गेले तरी हीच संधीग्धता कायम असल्यामुळे भुजबळांनी अखेर निवडणुकीतून माघार घेत असल्याचं क्लियर केलं. पत्रकार परिषदेत भुजबळांनी नाशिकच्या तिकीट वाटपाची क्रोनोलॉजी समजावून सांगितली. त्यांच्या बोलण्याचा सार असा की,

Chhagan Bhujbal यांनी माघार घेण्यामागचं नेमकं कारण काय? | Nashik Lok Sabha

होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवार यांचा निरोप आला होता. तिथे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे होते. नाशिक मधून छगन भुजबळ यांना उभं करा, असं थेट अमित शहांनी निरोप दिल्याचा त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही मतदारसंघात जाऊन आढावा घेतला. आम्हाला वातावरण चांगलं असल्याचं लक्षात आलं. अल्पसंख्याक, ओबीसी आमच्या बाजूने होते. त्यानंतर माझ्या उमेदवारीची मीडियामध्ये बातमी फुटली. हे सूरू झाल्यानंतर मी बातमी खरी आहे का? हे चेक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला ते म्हणाले की, अमित शाह यांनी तुम्हाला लढावं लागेल असे सांगितलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा तीच लाईन रिपीट केली. मात्र या जागेवरून अजून उमेदवारी काही जाहीर झालेली नाही. मविआच्या नाशिकच्या उमेदवाराचा प्रचार केव्हाचा पुढे गेलाय. जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल तेवढ्या नाशिकच्या जागेवर महायुतीच्या अडचणी वाढतील म्हणून मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय…

थोडक्यात काय तर आपण अमीत शाह, फडणवीस, अजितदादा या सगळ्यांची इच्छा असतानाही शिवसेनेसोबत चाललेल्या सुप्त संघर्षातून निवडणुकीतून माघार घेत असल्याचं भुजबळांनी हायलाईट केलं. त्यामुळे या जागेवरून आता शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. पण मतदारसंघात वारं तयार करूनही भुजबळांच्या नावाची लोकसभेसाठी उमेदवारीची मोहर उमटली नाही, त्याचं एक महत्त्वाचं कारण देखील आहे. ते म्हणजे भुजबळांचा मराठा विरोध…

छगन भुजबळ ओबीसींचे कडवे आणि कट्टर नेते समजले जातात. म्हणूनच मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाची राळ उठवलेले असताना आणि मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरलेली असताना त्याला पहिला विरोध केला तो भुजबळांनी… जरांगे पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा पेटवल्यामुळे कुठलाही राजकीय नेता त्यांच्याबद्दल बोलताना जपून आणि सारासार विचार करून बोलत होता. मात्र भुजबळांनी ओबीसींचे महामेळावे घेऊन जरांगे पाटलांना शिंगावर घेतलं. तुझी हिम्मत असेल आणि तू खरा पाटील असशील तर मंडल आयोगाला आव्हान दे, मंडल आयोग संपवून दाखव… अशा भाषेत भुजबळांनी जरांगेंना आव्हान दिलं. यानंतर भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातला वाद वाढत राहिला…एकमेकांना पर्सनल टारगेट केलं जाऊ लागलं…पुढे आंदोलनाची तीव्रता कमी झाली… मात्र भुजबळांची मराठा विरोधक म्हणून जी काही इमेज तयार झाली, ती तशीच कायम राहिली.

पण या विरोधाला खरी धार चढली जेव्हा भुजबळांचं नाव नाशिकच्या जागेसाठी चर्चेत आलं तेव्हा…भुजबळांना उमेदवारी मिळाली तर काय स्टॅन्ड घ्यायचा तो घेऊ, असं म्हणत जरांगे पाटलांनी एक प्रकारे भुजबळांना आव्हान दिलं… मराठा समाजाच्या मनात भुजबळांविषयी तीव्र नाराजी होती. त्याचे पडसाद पारा पारावर आणि सोशल मीडियावरही उमटत होते. त्यामुळे अल्पसंख्यांक आणि ओबीसी समाजाच्या मतांवर निवडून येण्याची स्वप्न पाहणाऱ्या भुजबळांना मराठ्यांनी मात्र चांगलाच दणका दिला असता. नाशिक मध्ये मराठा व्होट बँक पाठीशी असेल तरच मतांची बेरीज जुळून येते. त्यात मतदार संघातील मराठा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भुजबळांचं काम करणार नाही, असा स्टॅन्ड घेतला होता. पक्षातीलच अनेक कार्यकर्ते भुजबळांच्या या भूमिकेमुळे दुखावल्याचे बोलले जात होते..

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला. यानंतर सरकारमध्ये असतानाही भुजबळ या निर्णयाचा विरोध करत होते. थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचीही संधी त्यांनी सोडली नाही. त्यामुळे शिंदे सेना भुजबळांवर चांगलीच नाराज झाली. याचाच वचपा कदाचित त्यांनी नाशिकच्या जागेवरून काढला असावा. एकतर ही जागा स्टॅंडिंग खासदार हेमंत गोडसे म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेची होती. त्यामुळे इतर जागांवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून जे सहकार्य पाहायला मिळाले ते नाशिकच्या बाबतीत मात्र पाहायला मिळत नव्हतं. भुजबळ आधीच शिंदेंच्या विरोधात गेल्याने…त्यात स्वतः शिंदेंच्या रुपाने राज्याला मराठा मुख्यमंत्री मिळाल्याने…आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हक्काची जागा असल्याने…शिंदेंनी नाशिकसाठी कुठलीच तडजोड करायची नाही, असा जणू हट्ट धरला होता…भुजबळांना पाठिंबा म्हणजेच मराठ्यांना विरोध असं आपल्याबद्दल परसेप्शन तयार झालं असतं. मराठा समाजाची नाराजी शिंदेंना काही परवडली नसती. याचाच विचार करून भुजबळांच्या उमेदवारीला मराठा समाजाकडून, शिंदे सेनेकडून आणि पक्षातीलच मराठा कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध झाला…आणि याचाच परिणाम म्हणून भुजबळांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली…

मराठा समाजाबद्दल त्यांनी केलेली अनेक वक्तव्य ही अत्यंत कडवट होती, मराठा समाज जर तुम्हाला बायपास करत असतील तर सर्व न्हाव्यांनी एकही मराठ्याची हजामत करु नका. त्यांना आपआपसात भादरु द्या, ही आणि अशी अनेक एकामागून एक स्टेटमेंट करून भुजबळ हे मराठा समाजासाठी विलन बनले. भुजबळांचे बंधू समीर भुजबळ हे मागील दोन्ही टर्मला याच जागेवरून पडले होते. त्यामुळे आता महायुतीचा मोठा सपोर्ट असल्यामुळे आपण आरामशीर या जागेवरून निवडून येऊ, असा आत्मविश्वास असताना मात्र मराठा समाजाला केलेला विरोध हा आता आपल्याच अंगलट येत असल्याचं त्यांच्या ध्यानात येत असावं. मराठा आरक्षणाचा मुद्दा विझलेला असताना भुजबळांना उमेदवारी मिळाली तर त्याचा वनवा महाराष्ट्रभरातल्या मराठा समाजात पसरला असता. याची जाणीवही कदाचित महायुतीच्या नेत्यांना आली असावी. थोडक्यात काय तर भुजबळांना दिल्लीत जाण्याची आयती संधी चालून आली मात्र मनोज जरांगे फॅक्टर त्यांच्या या संधीत काळा बनून उभा राहीला. त्यामुळे लोकसभेची उमेदवारी मिळण्याच्या आधीच मराठ्यांना नडल्यामुळे भुजबळांना तलवार म्यान करावी लागली…हे झालं आमचं एनालिसिस, पण खरंच मनोज जरांगे फॅक्टरमुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीचा धसका घेतला आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.