हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाड (Wayanad) आणि रायबरेली (Raebareli) या दोन्ही मतदारसंघतून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी मोठ्या मताधिक्याने राहुल गांधींचा विजय झाला. मात्र आता त्यांनी वायनाडची खासदारकी सोडण्याचा निर्णय घेतला असून, तेथून प्रियांका गांधी पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहणार आहेत. राहुल गांधींच्या या निर्णयावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेलीची निवड का केली? यामागे कोणती कारणे आहेत? काँग्रेस या निर्णयाच्या माध्यमातून मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे का? चला याबाबत सविस्तर जाणून घेउयात….
१) रायबरेली हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला-
रायबरेली ही गांधी घराण्याची परंपरागत जागा आहे. काँग्रेससाठी देशातील सरावात सेफ जागा म्हणून आधीपासूनच रायबरेलीकडे बघितलं जात होते. एकार्थाने रायबरेलीला गांधी घराण्याचा बालेकिल्लाही म्हणता येईल. 1967 ते 1977 पर्यंत रायबरेलीची जागा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे होती. त्यानंतर 2004 पासून 2024 मध्ये राज्यसभेवर त्यांची नियुक्ती होईपर्यंत ही जागा सोनिया गांधी यांच्याकडे होती. अशा परिस्थितीत राहुल गांधींनी रायबरेली कायम ठेवण्याचे हेही एक कारण असू शकते.
२) उत्तर प्रदेशात काँग्रेसला मजबूत करणे –
केंद्रात सत्ता काबीज करायची असेल तर त्यासाठी आधी उत्तरप्रदेश जिकावी लागते, 80 लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तरप्रदेशातूनच केंद्रातील सत्तेचा मार्ग जातो. २०१९ च्या लोकसभेत काँग्रेसने उत्तर प्रदेशात सपाटून मार खाल्ला होता, मात्र २०२४ च्या लोकसभेत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला मिळून 43 जागा जिंकता आल्या. यामध्ये काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळवला. आता आगामी काळात उत्तरप्रदेशात काँग्रेसची ताकद आणखी वाढवून दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा काँग्रेसचा प्लॅन असू शकतो.
३) प्रियंका गांधींसाठी सुरक्षित जागा वायनाड –
तिसरं कारण म्हणजे प्रियंका गांधींसाठी सुरक्षित जागा म्हणून वायनाड ठरू शकते. 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाडमधून मोठा विजय मिळवला आहे. आता प्रियांका गांधी प्रथमच लोकसभा निवडणूक लढणार आहेत, अशावेळी राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रियंका गांधींच्या निवडणूक पदार्पणासाठी वायनाड पेक्षा सुरक्षित जागा असू शकत नाही.