जयंत पाटलांना फोन का केला नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या ईडीच्या रडारावर आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी काल ईडीने त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केली . ईडीचे समन्स आल्यापासून महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी आपल्याला फोन केलं मात्र अजित पवारांचा फोन आला नाही असं जयंत पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हंटल होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सुप्त संघर्ष सुरु आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय, परंतु आता अजित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

जयंत पाटलांना फोन का केला नाही असा सवाल पत्रकारांनी केला असता अजित पवार म्हणले, जयंत पाटील यांना एकट्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलावलं नाही. याआधी छगन भुजबळ यांना ईडीने बोलावलं होतं. त्यावेळी मी काही वक्तव्य केलं असेल तर मला दाखवा. अनिल देशमुख यांना देखील बोलावलं होतं. त्यावेळी मी काही वक्तव्य केलं असेल तर ते सुद्धा दाखवा. प्रफुल्ल पटेल यांच्यावेळी मी काही बोललो असेल तर दाखवा. तुम्ही जाणिवपुर्वक काही वेगळे अर्थ काढण्याचा प्रयत्न करता. मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर प्रतिक्रिया देत नाही आणि फोन कशाला करायचा त्यापेक्षा जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा मी त्यांना बोलेन असं म्हणत अजित पवारांनी प्रसारमाध्यमांनाच गार केलं.

दरम्यान, आगामी सर्व निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार का? असा सवाल केला असता महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार, हवं तर मी स्टॅम्प पेपर वर लिहून देतो, त्यावर उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि मी सह्याही देतो असं उत्तर अजित पवारांनी दिले. महाविकास आघाडी मध्ये एकी राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असतात. त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढू नका असं अजित पवारांनी म्हंटल.