व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नारळी पौर्णिमेला समुद्राची पुजा का करतात? जाणून घ्या त्यामागील धार्मिक कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील गोवा आणि गुजरात किनारपट्टीच्या भागात नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण एकाच दिवशी उत्साहात साजरी केला जातो. कोळी बांधव या सणादिवशी समुद्र देवता वरुण याची मनोभावे पूजा करतात. तसेच, त्याला नैवेद्य दाखवतात. या दिवशी वर्षानुवर्षे काम करणारे सर्व कोळी बांधव एकत्र येऊन सण साजरी करतात. घरी गोड जेवण बनवतात. नारळी भात तर या जेवणातील स्पेशल मेनू असतो.

श्रावण महिन्याच्या काळात महाराष्ट्राच्या विविध किनारपट्टी भागात साजरी केला जाणारा नारळी पौर्णिमा सण मासेमारीच्या हंगामाची सुरुवात करून देतो. या सणानिमित्त मच्छीमार कोळी बांधव समुद्राच्या वरुण देवाची पूजा करतात. या दिवशी वरुण देवाला नारळ अर्पण करण्याची महत्त्वाची प्रथा असते. नारळ अर्पण करत समुद्रातून भरपूर मासे मिळावेत अशी प्रार्थना वरुण देवाला करतात. नारळ हे फळ शुभसूचक असते तर त्याला सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानले जाते. त्यामुळे नारळ वरुण देवाला वाहिला जातो.

समुद्राची पुजा करण्यामागील कारण

नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव आपल्या बोटी छान सजवतात, त्या बोटींना समुद्रात घेऊन जात्यात.  थोड्या वेळाने परत आल्यानंतर कोळी बांधव आपल्या कुटुंबासोबत मिळून नारळी पौर्णिमा साजरी करतात. या दिनानिमित्त समुद्राची पूजा करण्यामागील अशी श्रद्धा असते की, समुद्राची पूजा केल्यानंतर वरुण देव प्रसन्न होऊन त्यांची भरभराट करतो. तसेच सर्व संकटांपासून त्यांचे रक्षण करतो. वरुण देवाची पूजा केल्यानंतर कधीही त्यांच्या व्यवसायात अडचणी येत नाहीत. समुद्र राजा त्यांना मासे पुरवतो.

नारळी पौर्णिमेनिमित्त वरुण देवासोबत शंकराची देखील पूजा करण्यात येते. श्रावण महिना भगवान शंकरासाठी महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यात शंकराला देखील तितकेच पूजले जाते. प्रत्येक सोमवारी शंकराची पूजा अर्चा केली जाते. त्यामुळे नारळी पौर्णिमेला वरुण देवासोबत शंकराला देखील तितकाच मान दिला जातो. या सणानिमित्त वरुण देवाची कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी कोळी बांधव पताके लावून संपूर्ण कोळीवाडा सुचवतात. नृत्य, गाणी, गोडाचा नैवेद्य अशा गोष्टी करून हा सण उत्साहात साजरी केला जातो.