हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी महाशिवरात्री (Mahashivratri 2024) उद्या म्हणजेच 8 मार्च रोजी साजरी केली जाईल. या महाशिवरात्री दिवशी भक्त शंकराची पूजा-आर्चा करतील. महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत देखील ठेवले जाईल. मात्र तुम्हाला माहित आहे का? ही महाशिवरात्री एवढ्या थाटामाटात, उत्साहात का साजरी केली जाते. नेमके महाशिवरात्रीचे महत्व आणि इतिहास काय आहे? नसेल माहित तर चला जाणून घेऊया.
महाशिवरात्रीचे महत्त्व काय? (Mahashivratri 2024)
हिंदू पोथी-पुराणात असे म्हटले आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. विश्वातील सर्व देवी देवतांनी येऊन यांच्या सोहळ्याला हजेरी लावत त्यांना आशीर्वाद दिले होते. त्यामुळे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यासह असेही म्हटले जाते की, समुद्र मंथनातून निघालेले हलाहल महाशिवरात्रीच्या दिवशी शंकरांनी प्राशन केले होते. यामुळे विश्वाचा विनाश होण्यापासून थांबला. याचेच ऋण फेडण्यासाठी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.
इतकेच नव्हे तर काहीजण असेही सांगतात की, महाशिवरात्रीच्या दिवशी (Mahashivratri 2024) शंकराने तांडव नृत्य केले होते. त्यांना शांत करण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती. त्यामुळेच महाशिवरात्री मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त शिवलिंगाची विशेष पूजा करतात. अनेक मंदिरांमध्ये विद्वान साधुंकडून होम हवन करण्यात येतात. यासह शिवलिंगावर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहिली जातात.
दरम्यान, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास धरणे अत्यंत लाभदायी मानले जाते. तसेच, उपवास केल्याने मनुष्याला इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती प्राप्त होते. महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे तर माणसाच्या मनातील गोंधळ शांत होतो. साधकाची अध्यात्माकडे वाटचाल सुरू होते. त्यामुळे त्याच्या मोक्षाचा मार्ग सुकर होतो. अशा अनेक कारणांमुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची पूजा करत व्रत धरले जाते.