हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज प्रत्येकजणांना कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी कर्जाची आवश्यकता भासत असते , मग ते लोन घरासाठी असो किंवा कारसाठी . या कर्जासाठी अर्ज करताना तुमचा क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा ठरतो. बऱ्याचदा लोकांनी सर्व बिलं वेळेवर भरली तरी त्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला नसतो. यामुळे अनेकजण नाराज होतात. कर्जाची उपलब्धता न झालयामुळे अनेकांची स्वप्ने अधुरी राहतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यामागची कारणे सांगणार आहोत .
क्रेडिट स्कोअरवर अनेक घटकांचा परिणाम
तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अनेक घटकांचा परिणाम होतो. त्यापैकी एक म्हणजे क्रेडिट मिक्स होय . हा तुमच्या सिक्युअर्ड (जामिन असलेला) आणि अनसिक्युअर्ड (जामिन नसलेला) कर्जाच्या प्रमाणावर आधारित असतो. अनसिक्युअर्ड कर्जामध्ये पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड कर्ज अधिक असेल तर त्याचा तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. होम लोनसारखे कर्ज सिक्युअर्ड कर्जाच्या विभागात येते, जे फायदेशीर ठरते.
चुकीच्या माहितीमुळे स्कोअर कमी
कधीकधी क्रेडिट रिपोर्टमध्ये चुकीची माहिती असल्याने स्कोअर कमी होतो. या चुकीच्या माहितीमध्ये एखादं कर्ज किंवा अकाउंट बंद केल्याची माहिती क्रेडिट एजन्सीकडे पोहोचत नाही. यामुळे चुकून डिफॉल्ट दाखवला जातो. म्हणून वेळोवेळी तुमचे क्रेडिट रिपोर्ट तपासणे महत्त्वाचे आहे. चुकीची माहिती सुधारल्यावर स्कोअर सुधारतो. या सुधारणा करून तुम्ही सहज कर्ज मिळवू शकता. तसेच जर तुम्ही सतत कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल, तर त्याचा वाईट परिणाम होतो. बऱ्याच अर्जांमुळे क्रेडिट संस्थांना तुमचं आर्थिक व्यवस्थापन कमकुवत वाटू शकतं. त्यामुळे फक्त गरज असेल तेव्हाच कर्जासाठी अर्ज करा.
कर्ज सेटलमेंट
तुम्ही सर्व ईएमआय किंवा बिलं वेळेवर भरत असाल, तरी एखादे पेमेंट उशिरा झाले असेल किंवा चुकले असेल, तर त्याचा परिणाम स्कोअरवर दिसतो. चुकलेलं पेमेंट त्वरित भरल्यास स्कोअर पुन्हा सुधारण्यास मदत मिळते. तसेच जर तुम्ही संपूर्ण कर्ज फेडण्याऐवजी कमी रक्कम देऊन सेटलमेंट केली असेल, तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो. तसंच जर बँक किंवा NBFC ने तुमचं कर्ज राइट ऑफ केलं असेल, तर तुमचा स्कोअर कमी होऊ शकते. त्यामुळे, कर्ज सेटलमेंट हा शेवटचा पर्याय ठेवा.