ऑनलाईन अँप वरून प्रेम, नंतर लग्न अन महिन्याभरातच दागिने आणि पैसे घेऊन नवरी फरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, पण आता ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून लग्न झाल्यानंतर एक वधू आपल्या सर्व दागिन्यांसह आणि पैशासह फरार झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने जवळील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत आरोपी महिला पीडित तरुणाच्या घरातील लाखोंचे सामान घेऊन फरार झाली असल्याचे म्हणले आहे. पोलिसांनी याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच एका ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्यामुळे त्या ॲपवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचे एका ऑनलाइन विवाह ॲपच्या माध्यमातून आरोपी महिलेची ओळख झाली होती. यानंतर या महिलेने तरुणाशी मैत्री केली. पुढे जाऊन या दोघांनी लग्न देखील केले. मात्र लग्न होऊन काही दिवस उलटून गेल्यानंतरच महिलेचा खरा चेहरा समोर आला. आरोपी महिला या तरुणाच्या घरातील लाखोंचा माल घेऊन फरार झाली आहे.

या संपूर्ण घटनेची चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे. त्यानुसार, आरोपी महिला लग्न करून फसवणूक करणाऱ्या एका गॅंगचा भाग होती. मुख्य म्हणजे यापूर्वी तिचे आणखीन एक लग्न झाले असून तिला तीन मुले देखील आहेत. फक्त या तरुणाची संपत्ती लुटण्यासाठी महिलेने हे लग्न केले होते. अशा अनेक तरुणांची महिलेने फसवणूक केल्याचा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या घटनेदरम्यान पीडित तरुणाने महिलेशी फोनवर संवाद साधल्यानंतर तिने आणखीन पैशाची मागणी केली असल्याचे तक्रारीत सांगितले आहे. सुरुवातीला पोलिसांनी देखील पीडित तरुणाची तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे त्याने स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ८ व्यक्तींवर याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.