जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक; सातारा पोलिसांची कारवाई

Jayakumar Gore
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या काही दिवसांपूर्वी साताऱ्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते (Hambirrao Mohite) यांच्या कुटुंबातील एका महिलेला त्रास दिल्याचे म्हटले होते. त्यामुळे हा विषय राजकीय वर्तुळात गाजला होता. तसेच गोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीने जोर धरला होता. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

खंडणी प्रकरणात संबंधित महिलेची अटक

मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी ही कारवाई केली असून, संबंधित महिलेकडून १ कोटी रुपयांची रक्कम स्वीकारण्यात आली आहे. तपासादरम्यान उघडकीस आले की, या महिलेने एकूण ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता घेत असताना तिला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत ही कारवाई केली आहे.

नेमके प्रकरण काय?

जयकुमार गोरे हे सध्या माण-खटाव मतदारसंघाचे आमदार आणि राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री आहेत. २०१६ मध्ये काँग्रेस पक्षात असताना त्यांच्यावर एका महिलेने आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, जिल्हा व उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला, त्यामुळे त्यांना काही काळ कारागृहात राहावे लागले होते.

यानंतर काही वर्षे या प्रकरणाची चर्चा झाली नव्हती. मात्र, जानेवारी महिन्यात संबंधित महिलेला एक निनावी धमकीचे पत्र मिळाल्याचे तिने सांगितले. यानंतर तिने पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करत कारवाईची मागणी केली. परंतु, आता समोर आलेल्या तपासानुसार, तिनेच हा विषय मिटवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे.

जयकुमार गोरे यांचे स्पष्टीकरण

या सर्व घडामोडींनंतर जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “माझ्यावर २०१७ साली एक गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल २०१९ मध्ये लागला. न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले होते. आज सहा वर्षांनी पुन्हा हा मुद्दा उकरून काढण्यामागे राजकीय हेतू असावा.”

त्यांनी पुढे असेही सांगितले की, “माझे वडील नुकतेच दिवंगत झाले, पण त्यानंतरही माझ्यावर असे आरोप करून मानसिक त्रास दिला जात आहे. विरोधकांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरूच राहतात, पण अशा खालच्या पातळीवर जाऊन कोणीही राजकीय फायदा घेत काम करू नये.”

दरम्यान, मधल्या काळात जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांमुळे भाजपवर दबाव वाढला होता. यामुळे जयकुमार गोरे यांची राजकीय कारकीर्द देखील धोक्यात आली होती. मात्र आता या प्रकरणातील संबंधित महिलेलाच खंडणी घेताना अटक करण्यात आल्यामुळे भाजपने पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडींवर विरोधक काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.