हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी BCCI ने Women’s Premier League 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार वुमन्स प्रीमियर लीगला 23 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. लिगचा अंतिम सामना 17 मार्च रोजी खेळला जाईल. गेल्या वर्षी लीगच्या सामन्यांचे आयोजन मुंबई आणि नवी मुंबई येथेकरण्यात आले होते. मात्र आता हे सामने बंगळुरु आणि दिल्लीत आयोजित करण्यात आले आहेत.
कोणत्या स्टेडियमवर सामने रंगणार?
Women’s Premier League 2024 सर्व सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आणि बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानात रंगणार आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण 22 सामने खेळले जातील. यातील 11 सामने दिल्लीत आणि 11 सामने बंगळुरुत रंगणार आहेत. खास म्हणजे, लीगच्या स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सने स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला हार मानावी लागली होती.
आता या स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात करण्यात येत आहे. या स्पर्धेचे सुरुवातीचे 11 सामने बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडतील. त्यानंतर पुढील सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगवले जातील. या स्पर्धेमध्ये साखळी फेरीतील 20, एलिमिनेटर आणि फायनलचे धरून 22 सामने खेळले जातील. यात साखळी फेरीतील सामन्यांमध्ये जो संघ सर्वोच्च स्थानी राहील तो थेट अंतिम फेरीत पोहोचेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघ एलिमिनेटरचा सामना खेळून अंतिम फेरीत प्रवेश करेल. या स्पर्धेदरम्यान एका दिवशी एकाच सामना रंगवला जाईल.
महत्वाचे संघ
Women’s Premier League 2024 स्पर्धेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), गुजरात जाएंट्स (GG), मुंबई इंडियन्स (MI), दिल्ली कॅपिटल्स (DC), यूपी वॉरियर्स (UPW) हे पाच महत्त्वाचे संघ असणार आहेत.