पुण्यात दुहेरी उड्डाणपूल व पुढच्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुण्यातील मेट्रो पुणेकरांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. पुण्यातल्या ट्रॅफिकला कंटाळलेले पुणेकर स्वस्तात आणि वेगवान प्रवास म्हणून मेट्रोचा पर्याय निवडताना दिसत आहेत. अशातच आता मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उदघाटन कधी होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. एवढेच नाही तर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील पुणे मेट्रोच्या विस्ताराला मंजुरी देण्यात आली असून हडपसर,खराडी आणि नाळ स्टॉप येथील मार्गावर देखील मेट्रोला मंजुरी मिळाली आहे. मेट्रोचा पुढचा टप्पा असलेल्या हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो बाबत एक अपडेट समोर आली आहे. दुहेरी उड्डाणपूल व शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.

गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी मोजणी

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक कात्रज येथील मिळकतींची मोजणी मागील महिन्यात झाली. त्यापाठोपाठ आता गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी जमिनीच्या मोजणीचे कामदेखील पूर्ण झाले आहे. ५२ मिळकतींची मोजणी झाली असून या प्रक्रियेचा सविस्तर भूमापन अहवाल भूमी अभिलेख विभागाकडून महापालिकेला सादर केला जाणार आहे.

दुहेरी उड्डाणपूलसह मेट्रोचे काम सुरु

शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषी महाराज चौकात सध्या दुहेरी उड्डाणपूल व शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान, या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. मेट्रो, उड्डाणपुलाच्या काम एकीकडे सुरू असतानाच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने विकासआराखड्यात असलेल्या गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणाचेही काम हाती घेतले आहे.

शिवाजीनगरकडून विद्यापीठाकडे जाताना धोत्रे पथापासून ते महावितरण कार्यालयापर्यंत तसेच विद्यापीठाकडून शिवाजीनगरकडे येताना नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) रिझर्व्ह बॅंकेच्या कृषी महाविद्यालयापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील रस्ता रुंदीकरणाचे काम विविध तांत्रिक कारणांमुळे अडखळले होते.

कधी सुरु होणार हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो

सध्या शहरात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 3 मार्गाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गाचे किमान 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबरमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी, शिवाजीनगर-औंध विभागातील सार्वजनिक व शासकीय सुटीच्या दिवशी गर्डर टाकणे व इतर बांधकामांना परवानगी देऊन कामाला गती देण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. पुढील वर्षी पुण्यातील हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो सुरु (Pune Metro) होऊ शकते.

23 स्थानके असतील

पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी माणगाव ते हिंजवडी मार्गे शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग विकसित करत आहे. याचे 99 टक्के भूसंपादन पूर्ण आणि 70 टक्के काम पूर्ण झाल्याने, हा बहुप्रतीक्षित मार्ग एप्रिल 2025 पर्यंत खुला होईल असे दिसते. या मार्गाची एकूण लांबी 23.203 किमी असून, त्यावर 23 स्थानके असतील.