लोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गतीने कामे करावीत; शंभूराज देसाई यांचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्य सरकार गतीने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. हे सर्व सामान्याचे सरकार आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी लोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गतीने कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी श्री. देसाई बोलत होते.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी किर्ती नलवडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेची बैठक येत्या 30 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करावी. जिल्ह्यातील आमदार महोदयांकडून त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांच्या याद्या घ्या अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पाटण विधानसभा मतदारसंघातील मातोश्री पाणंद रस्त्यांचा आढावा

श्री. देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील मातोश्री पाणंद रस्त्यांचा आढावा ही घेतला. सन 2021-22 मधील अपूर्ण कामे व सन 2022-23 मधील कामे कालमर्यादेत पूर्ण करा. पाणंद रस्ते तयार करीत असताना प्राधान्याने अतिक्रमणे काढा, अशा सूचनाही श्री. देसाई यांनी केल्या.

उत्तर मांड व महिंद प्रकल्पांतर्गत प्रलंबित पुनर्वसनाचा आढावा

उत्तर मांड प्रकल्पांतर्गत माथनेवाडी व महिंद प्रकल्पांतर्गत बोरगेवाडी गावाच्या पुनर्वसनाच्या अपूर्ण कामासंदर्भातही आढावा श्री. देसाई यांनी घेतला. माथनेवाडी ता. पाटण येथील काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही त्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ जलसंपदा विभागाकडे पाठविण्याच्या सूचनाही शंभूराज देसाई यांनी केल्या.