हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड पालिका प्रशासनाकडून सध्या पावसाळापूर्व उपाययोजनांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालिकेस मुख्याधिकारी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारीच निर्णय घेत आहेत. पावसाळ्यात शहरात पूर्वीप्रमाणे पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये असे कराडकरांना वाटत आहे. अशात नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील पावसाळापूर्व उपाययोजनांची मोहीम राबविण्याचे आव्हान पालिका अधिकरी व कर्मचाऱ्यापुढे आहे. याबाबत हॅलो महाराष्ट्र्ने शहरातील पालिका प्रशासन अधिकारी सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांची संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला.
कराड पालिकेच्या सत्तेत व पदावर नसल्यामुळे आता पावसाळ्यात उध्दभवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी माजी नगरसेवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यांनी पावसाळ्यास सुरुवात होण्यापूर्वी शहरातील आपापल्या प्रभागातील ड्रेनेजची, आरोग्याची कामे पूर्ण करावी अशी अपेक्षा कराड शहरातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घ्यावा : माजी नगरसेवक सौरभ पाटील
कराड शहरातील महत्वाचा विषय असलेला पुराचा प्रश्न यंदाही निर्माण होईल का अशी शंका कराडकरांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे पालिकेचा कारभार हा प्रशासनाच्या हाती गेल्यामुळे शहरातील स्वच्छतेपासून ते पावसाळ्यात उध्दभवणाऱ्या समस्या सोडवण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. याबाबत माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी शहरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवर आता स्थानिक माजी नगरसेवकांनी एकत्रित येत आपापल्या प्रभागातील स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन स्वतः उपाय योजना कराव्यात जेणेकडून पावसाळ्यात परिस्थिती हाताळता येईल असे सुचवले.
पालिकेकडून पावसाळापूर्व उपाययोजनेची कामे सुरु : उपमुख्याधिकारी विशाखा पवार
कराड शहरात पालिका प्रशासनाकडून पावसाळापूर्व उपाययोजनांची कामी हाती घेण्यात आली आहेत. प्रशासनाकडून शहरातील आपत्ती व्यवस्थापन आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रत्यक्षात कार्यान्वित केला जाईल. शहरातील नाले सफाई वृक्षांच्या छटाईची कामे सध्या सुरु असल्याचे पालिकेच्या उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांनी सांगितले.
कराडला मुख्याधिकाऱ्यांची लवकर नेमणूक गरजेचे : माजी नगरसेवक विजय वाटेगावकर
कराड शहरातील स्वच्छतेसह इतर कामे ही सध्या पालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत. शहरात वीज वितरण कंपनी व पालिकेकडून प्रत्येक मंगळवारी व अधून मधून वृक्षांची फांदी छटाई केली जात आहे. नाले सफाईचा माध्यमातून स्वच्छतेची कमाईही हाती घेण्यात आली आहेत. मात्र काही ठिकाणी आर्थिक निर्णय घेण्यासाठी मुख्याधिकारी असणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची लवकरात लवकर नेमणूक होणे गरजेची असल्याचे माजी नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.