WTC Final : शुबमन गिलवर ICC ची मोठी कारवाई; ‘ते’ Tweet महागात पडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया कडून दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आणि सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) यांच्यावर ICC ने मोठी कारवाई केली आहे. स्लो ओव्हर रेटवरून टीम इंडियाला 100 % दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर दुसरीकडे वादग्रस्त पद्धतीने बाद झाल्यानंतर गिलने सोशल मीडियावर अंपायरच्या निषेधार्थ पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट त्याला चांगलीच महागात पडली असून ICC ने त्या ट्विटची दखल घेत शुभमन गिलची संपूर्ण मॅच फी आणि अतिरिक्त 15% असा एकूण 115 % दंड ठोठावला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलची विकेट वादग्रस्त ठरली. कॅमेरून ग्रीनने गिलचा पकडलेला कॅच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता, मात्र टीव्ही अंपायर रिचर्ड केटलब्रो यांनी ग्रीनने पकडलेला कॅच व्यवस्थित असल्याचे म्हणत शुभमन गिलला बाद केलं. त्यानंतर गिलने आपल्या ट्विटर अकाउंट वरून नाराजी व्यक्त करत अंपायरच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे ICC कोड ऑफ कंडक्टच्या कलम 2.7 अंतर्गत त्याला दोषी ठरवत 15 % दंड ठोठावला आहे.

दुसरीकडे, स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघावर कठोर कारवाई केली आहे. भारतीय संघाची तर संपूर्ण मॅच फी कापण्यात आली आहे तर ऑस्ट्रेलियन संघाला 80% दंड भरावा लागणार आहे. निर्धारित वेळेत षटक पूर्ण न केल्यास प्रति षटकाच्या 20 टक्के मॅच फीचा दंड आकारला जातो. फायनल मॅच मध्ये भारतीय संघाने निर्धारित वेळेत तब्बल पाच षटकं कमी टाकली, तर ऑस्ट्रेलियन संघाने चार षटकं कमी टाकली. त्यामुळे ICC ने ही कारवाई केली आहे.