यवतमाळ प्रतिनिधी । माणसाच्या आयुष्यात सर्वाधिक जड प्रसंग कोणता असेल तर तो म्हणजे थकलेल्या वडिलांच्या खांद्यावर तरुण मुलाचे शव वाहून नेण्याचा प्रसंग. त्यातही जर घरातील मुलगा नुकताच शिकून कमवायला लागला असेल आणि त्याचे लग्न ठरले असेल तर त्या वडिलांचे दुःख त्या परिवाराशिवाय कुणीही समजू शकत नाही. हा प्रसंग उद्भवला आहे जिल्ह्यातील ढाणकी या गावातील एका कुटुंबियांवर.
अधिक माहिती अशी, ढाणकी परिसरातील शमीउल्ला खाँ पठाण, त्यांचा मुलगा शहादत खान आणि परिवारातील इतर सदस्य शेतात गेले होते. अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने शहादत खान हा आंब्याच्या झाडाखाली थांबला. तर त्याचे वडील आणि इतर कुटुंबीय जवळील झोपडीच्या आडोशाला. विजेचे रुद्र रूप पाहून त्याच्या वडिलांनी आणि भावंडांनी शहादतला हाकाही मारल्या होत्या. परंतु तेवढ्यातच शहादतच्या अंगावर अचानक वीज कोसळली आणि त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. त्याच्या वडिलांनी आणि भावंडांनी शहादतला डोळ्यादेखत मृत्यूच्या दाढेत जाताना पाहिले.
शहादत हा एक दिवस आधीच हैदराबाद येथून आपल्या आई वडीलांना भेटण्यासाठी गावी आला होता. त्याने इंजीनियरिंग शिक्षण पूर्ण करून नुकतीच कंपनीत नोकरी सुरू केली होती. काही दिवसातच त्याचा विवाह होणार होता. अचानकच काळाने त्यावर झडप मारून सर्व काही उध्वस्त करून टाकले. शम्मीउल्ला खान यांची परिस्थिती जेमतेम आहे. शहादत नोकरीला लागल्यामुळे त्यांनी सुखी आयुष्याचे स्वप्न रंगविली होती परंतु या या दुर्घटनेमुळे त्या कुटुंबियांची सर्व स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शहादतचा डोळ्यादेखत झालेला मृत्यू पाहून त्यांच्या कुटुंबीयांना तीव्र मानसिक धक्का बसला आहे.