हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सात मतदारसंघ, दिग्गज नेते, दोन वेळा मुख्यमंत्रीपद, आणि काँग्रेसची अनेक राजकीय घराणं ज्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिली तो यवतमाळ जिल्हा… २०१४ च्या मोदी लाटेत मात्र काँग्रेसचा हा बालेकिल्ला भुईसपाट झाला… कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा ते शेतकरी आत्महत्यांचा शाप लागलेला जिल्हा अशी दोन विरुद्ध टोक पाहायला मिळणाऱ्या यवतमाळमध्ये राजकारण बदललं.. पक्ष बदलले.. पण प्रश्न, परिस्थिती तशीच राहीली… बाकी लोकसभेच्या निवडणुकीत यवतामाळनं भिडू बदललाय.. त्यामुळे विधानसभेला पुसद पासून उमरखेड पर्यंत हायव्होल्टेज असणाऱ्या सात विधानसभा मतदारसंघांचा निकाल कसा लागतोय? यवतमाळ जिल्ह्यात यंदा सात आमदार नेमके कोण होतायत.. जिल्ह्याचा कौल कुणाच्या बाजूने जातोय.. त्याचाच हा क्लिअर कट आढावा…
पहिला मतदारसंघ आहे तो वणीचा… वणीचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे संजीव रेड्डी बोदकुलवार… २०१४ च्या मोदी लाटेत बोदकुलनवार यांनी भाजपला या मतदारसंघात त्यांनी पहिल्यांदा कमळ फुलवून दिलं.. २०१ ९ मध्येही काँग्रेसच्या वामनराव कासावार यांना पाणी पाजत बोदकुलनवार यांनी आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवली.. यवतमाळ जिल्ह्यात असणारा हा मतदारसंघ मात्र लोकसभेला चंद्रपूर मतदारसंघात येतो… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला भाजपचा स्टॅडींग आमदार असतानाही वणीतून काँग्रेसच्या धानोरकरांना तब्बल ५० हजारांच्या आसपास लीड मिळालं.. यावरुन येणाऱ्या विधानसभेला वणीत काँग्रेसच्या विजयाचे चान्सेस वाढले असून बोदकुलनवार यांच्यासाठी हा रेड सिग्नल असणारय… एका बाजूला कोळसा तर दुसऱ्या बाजूला कापूस म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट गोल्ड.असूनही या मतदारसंघात सूतगिरणी उद्योग नाही. ज्या सूतगिरण्या सुरु झाल्या, त्या बंद पडल्या आहेत… त्यामुळे रोजगाराच्या, शेतीच्या अवतीभोवती इथली निवडणुक फिरताना यंदा दिसू शकते.. बाकी कुणबी समाज वणीत एक्स फॅक्टर समजला जातो. हा समाज कुणाच्या बाजूने राहतो, यावर इथला निकाल अवलंबून असतो.. सध्यातरी काँग्रेसचे वामनराव कासावार यांच्या विजयाचे चान्सेस वणीत वाढले आहेत..
दुसरा मतदारसंघ पाहुया तो राळेगावचा… आदिवासींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघा काँग्रेसच्या डाॅ. वसंत पुरके यांनी १९९५ मध्ये या मतदारसंघातून विधानसभेची एन्ट्री मिळवली ती कायमचीच.. त्यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सब कुछ पुरके… आणि सब कुछ काँग्रेस… असंच समीकरण चाललं होतं.. पण काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळला तो २०१४ साली… भाजपच्या अशोक उइके यांनी भाजपकडून हा मतदारसंघ स्वत: च्या ताब्यात घेतला.. आणि राळेगावात कमळ फुललं.. छोट्या-मोठ्या गावात त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि आपुलकीची भाषा यामुळे राळेगावात उइकेंचं राजकीय वजन वाढलं… त्याच्याच जीवावर त्यांनी २०१९ लाही वसंत पुरकेंना मात देत उइकेंनी आपला गुलाल कायम ठेवला.. त्यामुळे मतदारसंघात भाजपची पाळंमुळं चांगली घट्ट रुजली गेलीयेत.. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला राळेगावमध्ये मशालीला लीड मिळाल्यानं उइकेंची आमदारकी रेड झोनमध्ये गेलीय.. यंदाही पुरके वर्सेस उइके अशी कडवी लढत राळेगावात पाहायला मिळणार आहे..
तिसरा मतदारसंघ येतो तो यवतमाळचा… यवतमाळ विधानसभेचा इतिहास बघता 1962 झाली जांबुवंतराव धोटे हे या मतदारसंघाचे पहिले आमदार… त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची जी मागणी लावून धरली होती, त्याचा सेंटर पाँइंट हा मतदारसंघच राहीला… 2004 साली भाजपचे मदन येरावार हे या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2009 साली पुन्हा काँग्रेसने बाजी मारली. त्यावेळी काँग्रेसचे निलेश पारवेकर यांनी विधानसभेचे मैदान काबीज केलं. पारवेकर यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली त्या 2013 च्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नंदिनी निलेश पारवेकर यांनी मदन येरावार यांचा पराभव केला. त्या यवतमाळ विधानसभेच्या महिला आमदार झाल्या. त्यानंतर यवतमाळचे राजकीय वातावरण पुन्हा बदललं आणि 2014 मध्ये भाजपच्या मदन येरावार यांनी अटीतटीच्या लढतीत आमदारकी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली.. भाजपच्या पहिल्या कार्यकाळात येरावार यांना मंत्रीपद मिळालं… २०१९ ला पुन्हा एकदा येरावार यांनीच निवडणुक जिंकली असली तरी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचा अतिशय निसटत्या मतांनी या निवडणुकीत पराभव झाला होता… त्यात या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या पारड्यात पडलेलं लीड पाहता इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच होऊ शकतो.. विद्यमान आमदार येरावार यांच्याविरोधातील एन्टीइन्कबन्सी.. आणि लोकसभेला बॅकफुटला गेलीली मतं पाहता काँग्रेसकडून मांगुळकर तर शरद पवार गटाकडून विधान परिषदेचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी दंड थोपाटले आहेत… स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार आघाडीकडून बाजोरिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन तेच विजयाचा गुलाल लावतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय..
चौथा मतदारसंघ दिग्रसचा… शिवसेनेचे संजय राठोड यांचा दिग्रस हा एकहाती बालेकिल्ला… २००४ ला माणिकराव ठाकरेंचा तर २००९ ला तेव्हाच्या काँग्रेसमधील संजय देशमुखांचा मोठ्या लीडने पराभव करत ते आमदार झाले.. हाच सिलसीला २०१४, २०१९ लाही कायम ठेवत दिग्रसमध्ये सब कुछ राठोड अशी परिस्थिती निर्माण झाली… त्यांची मतदारसंघातील लोकप्रियता, जनसंपर्क आणि इजी टू एक्सिस असणं या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्यांना सध्यातरी कडवी फाइट देईल, असा विरोधकच राहीलेला नाहीये… बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं… 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली… पण पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण… त्यावरुन मंत्रीपदाचा राजीनामा… मीडियामध्ये झालेली बदनामी… आणि शिवसेना फुटीत घेतलेला सहभाग या सगळ्यात राठोडांच्या इमेजला पुरते धक्के बसले… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातूनही त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी लीड मिळवून देता आलं नाही… सध्या संजय देशमुख खासदार आहेत.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला दिग्रसधून महाविकास आघाडीकडून अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.. माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल ठाकरे यांना राठोडांच्या विरोधात मविआकडून उमेदवारी मिळण्याचे चान्सेस आहेत, पण मतदारसंघातील बंजारा समाजाचं हक्काचं मतदान राठोडांच्या पाठिशी राहत असल्यामुळे त्यांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी आघाडीला इथली स्थानिक जातीय समीकरण पाहून उमेदवारी देण्याचा विचार करावा लागणार आहे, एवढं मात्र नक्की…
पाचवा मतदारसंघ येतो तो पुसदचा… माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक या पुसदच्या दोन सुपुत्रांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वात राज्याने हरितक्रांती तसेच जलसंधारणच्या माध्यमातून विकासाची पावलं टाकली… याच नाईक घराणं आणि पुसदकरांची अशी एक राजकीय नाळ जुळली ती कधीच तुटता तुटली नाही… राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नाईकांनी घड्याळ हाती बांधल्यानंतर पुसदचं राजकारण काँग्रेस टू राष्ट्रवादी असं शिफ्ट झालं… 2004, 2009 आणि 2014 या वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने मनोहर नाईक यांना भक्कम पाठिंबा दिला. आघाडी सरकार मध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा सांभाळलं… मात्र वर्चस्वाच्या लढाईतून काकांना म्हणजे मनोहर नाईकांना निलय नाईक यांनी राजकीय आव्हान दिलं.. भाजपात जाऊन काकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या.. पण मनोहर नाईकांनी मतदारसंघावरची आपली आणि राष्ट्रवादीची पकड तसूभरही कमी होऊ दिली नाही… पण २०१९ च्या निवडणुकीत राजकारण तिसऱ्या पिढीपर्यंत येऊन पोहचलं.. भाजपकडून निलय नाईक तर राष्ट्रवादीकडून मनोहर नाईकांचे सुपुत्र इंद्रनिल निवडणुकीच्या रिंगणात उतरले… पण इंद्रनिल नाईकांनी पहिल्या निवडणुकीत दणक्यात विजय मिळवून पुसदमधील राष्ट्रवादीची ताकद सगळ्यांना दाखवून दिली.. पण महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागून एक ट्विस्ट मागच्या दोन वर्षात बघायला मिळाले.. अर्थात त्याचे धक्के नाईक कुटूंबापर्यंत जाऊन पोहचले… राष्ट्रवादीच्या फुटीत मनोहर नाईक यांच्या घरातही उभी फूट पडली विद्यमान आमदार इंद्रनिल नाईक यांनी अजितदादा गटाची वाट धरली.. पण या निर्णयाने नाराज होत त्यांचे सख्खे बंधू ययाती नाईक यांनी शरद पवारांसोबतच राहणं पसंद करुन विधानसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवलीय.. त्यामुळे २०१९ ला चुलत भावांच्यात बघायला मिळालेली निवडणुक आणखीन काट्याची होत दोन सख्ख्या भावांच्यात पाहायला मिळेल.. निलय नाईक यांना विधानपरिषदेवर घेतल्यानं इंद्रनिल विरुद्ध ययाती हा पुसदमधील सर्वात हायव्होल्टेज निवडणुक मतदारांना पाहायला मिळणार आहे… नाईक कुटूंबाच्या वर्चस्वाच्या लढाईसोबत मतदारसंघातील जनता कोणत्या राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे? याचा फैसलाही या मतदारसंघातून होणार असल्यानं दोन्ह पवार पुसदच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतील, एवढ मात्र नक्की…
सहावा मतदारसंघ येतो तो उमरखेडचा… यवतमाळ जिल्ह्यातला असणारा हा मतदारसंघ लोकसभेला मात्र हिंगोलीत येतो… विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रादेशिक विभागांना जोडणाऱ्या या मतदारसंघाची खासीयत म्हणजे मागील ५० वर्षात मतदारसंघात एकदा निवडून आलेला आमदार पुन्हा रिपीट झालेला नाहीये.. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले त्यावेळी भाजपचे राजेंद्र नजरधने यांनी काँग्रेसच्या विजय खडसे यांचा पराभव केला… तर 2019 मध्ये काँगेसच्या विजय खडसे यांचा पराभव करत नामदेव ससाणे सध्या विद्यमान आमदार आहेत… स्वच्छ भारत मिशन घोटाळ्याचा आरोप, मराठा समाजाकडून होणारा विरोध पाहता यंदाही भाजप चेहरा बदलीचा कार्यक्रम उमरखेड मध्ये करणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे… बाकी महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेलं उमरखेड मधील लीड पाहता यंदा भाजपची या मतदारसंघातील आमदारकी सध्या तरी रेड झोन मध्ये दिसतेय…
सातवा आणि शेवटचा मतदारसंघ आर्णी…भाजपचे संदीप धुर्वे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार… 2019 मध्ये भाजपने स्टॅंडिंग आमदार राजू तोडसाम यांना आमदारकीचं तिकीट नाकारलं होतं… त्यांचे वायरल झालेले अनेक व्हिडिओ, त्यांच्या दोन बायकांमध्ये झालेली हातापायी आणि इतर आरोप ही भाजपसाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरली असती… म्हणूनच माजी आमदार असणाऱ्या संदीप धुर्वे यांना तिकीट देऊन त्यांना भाजपने विद्यमान आमदार बनवलं… मागच्या दोन्ही टर्मला केळापूर आर्णी मतदारसंघातून भाजपच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी लढत दिली… पण त्यांना पराभवाचा धक्का बसत भाजपने आपला गड शाबूत राखला… त्यामुळे यंदा तरी मोघेंना भाजपला नमवत आमदार होता येईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…