हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajeet Sawant) यांना मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar)हा पोलिसांसमोर नरमला आहे. इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला होता. मोबाईलमधील संपूर्ण डाटा सुद्धा आपण स्वतःहून डिलीट केला असल्याची कबुली कोरटकर याने पोलिसांना दिली. इतकंच नव्हे तर जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आपण मंचरियाल येथून चेन्नईला जाणार असल्याची माहिती कोरटकर यांनी पोलिसांना दिली.
प्रशांत कोरटकरला न्यायालयाकडून 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर बुधवारी त्याचे फॉरेन्सिक टीम कडून तपासणी करण्यात आले. तत्पूर्वी मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी पोलिसांनी प्रशांत कोरटकरची कसून चौकशी केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच फोनवर माज दाखवणारा कोरटकर पोपटासारखा बोलू लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली त्याने दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय, आपल्या मोबाईलमधील सगळा डेटा मीच उडवल्याची कबुली देखील कोरटकरने दिली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत कोरटकर हा हैद्राबाद मार्गे चेन्नईमध्ये पळून जाण्याचा तयारीत असल्याचीही माहिती चौकशीत समोर आली. यापूर्वी इंद्रजित सावंत याना मी कॉल केलाच नाही, माझा आवाज मॉर्फ केलाय असा दावा कोरटकर यांनी केला होता… आता मात्र पॉलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कबुली दिली असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने बुधवारी प्रशांत कोरटकर याच्या आवाजाचे नमुने घेतले. जवळपास तीन-चार तास ही प्रक्रिया समोर होती. त्याचा अहवाला येत्या चार-पाच दिवसांत येण्याची शक्यता आहे. इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यातील संभाषणाचे विश्लेषण फॉरेन्सिक टीमकडून केले जाईल. त्यासाठी इंद्रजीत सावंत यांच्या आवाजाचेही नमुने पोलिसांकडून घेण्यात आले आहेत.
प्रशांत कोरटकर हा तब्बल महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यामुळे त्याला पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा सपोर्ट होता का? या चर्चाही राज्यात रंगल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकर कुठे गेला होता, कोणाची मदत घेतली, कुठे किती दिवस राहिला, यादरम्यान कोणीकोणी मदत केली, असे प्रश्न पोलिसांनी प्रशांत कोरटकरला विचारले.