राजसाहेब, महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घ्या; तरुणाने रक्ताने लिहिले पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. राजकीय नेते सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर न बोलता एकमेकांसोबत वाद घालत बसले आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणाने थेट रक्ताने पत्र लिहून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविले आहे. आता “महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी राज ठाकरे यांनी घ्यावी” अशी भावना या तरूणाने पत्रात व्यक्त केली आहे. विशाल ढेबे असे या सदर तरुणाचे नाव असून त्याने आपल्या पत्रात सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडींबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार निर्माण झाल्यापासून काय सुरु आहे? असा सवाल विशालने विचारला आहे.

विशालने पत्रात काय लिहले?

सध्या महाराष्ट्रातील राजकारणी ज्वलंत प्रश्नांकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. ते फक्त स्वतःच्या हितासाठी राजकारण करत आहेत. समृद्धी महामार्गावर मोठा अपघात होऊन सुद्धा लोकप्रतिनिधी शपथविधी करताना दिसतात. महाराष्ट्रातील महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यातील प्रमाण वाढत आहे. मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. असे असून सुद्धा शासन आपल्या दारी या योजनेतून सरकार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करते. पण नागरिकांचे नेमके प्रश्न काय आहेत हे सोडवण्याचा प्रयत्न सरकार करीत नाही. यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही महाराष्ट्राला वाचवण्यासाठी धुरा आपल्या खांद्यावर द्यावी. यातून महाराष्ट्राला एक वैभव लाभावे. अशा भावना गोंदियाच्या विशाल ढेबेने आपल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत.

विशालने रक्ताने लिहिलेल्या या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी विशालच्या या पत्रावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिले आहेत. मुख्य म्हणजे या पत्रामध्ये विशालने राज ठाकरे यांना महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्या खांद्यावर घ्यावे अशी विनंती केली आहे.विशालच्या या पत्राच्या रूपाने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा सर्वसामान्य नागरिकांवर कसा परिणाम होऊ शकतो हे दिसून आले आहे.