Monday, March 20, 2023

युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव

- Advertisement -

पुणे प्रतिनिधी।
काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विविध विकासकामात महत्वाचे योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव करण्यात आला आहे. सैन्य दलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्या हस्ते त्यांना प्रशंसा प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. पुनीत बालन ग्रुप आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून पुनीत बालन हे देशभर सामाजिक कार्य करीत आहेत. प्रामुख्याने ‘नेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत त्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

- Advertisement -

इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराकडून चालविण्यात येत असलेल्या दहा शाळा त्यांनी चालविण्यास घेतल्या असून सर्व आर्थिक मदत केली जात आहे. या सर्व शाळा बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पेहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, व्हेन, घुरेस या अतिरेक्यांचा सर्वांत जास्त धोका (हाय मिलेटिन्स) असलेल्या भागात आहेत. याशिवाय बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेल्या डगर स्कुलला तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक मदत केली जात आहे.

काश्मीर खोऱ्यातील अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविण्यासाठी पुनित बालन ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते, यांत आफरीन हैदर (तायक्वांदो), सायकलपट्टू मोहोम्मद सलीम, उमर सय्यद (खो खो) अश्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे. तसेच प्रजासत्ताक दिनी अतिरेक्यांचा सर्वात जास्त धोका असलेल्या शोपियान मध्ये सर्वांत 150 फुट उंचीचा तिरंगा ध्वजही उभारला आहे.

काश्मीर खोऱ्याच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी त्यांच्या या भरीव कामगिरीची दखल घेऊन दिल्ली येथे भारतीय सैन्य दलाकडून उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी बालन यांना प्रशंसा प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे अभिनंदन केले. या गौरवानंतर इंद्राणी बालन फाउंडेशन आणि पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी भावना व्यक्त करीत म्हटले आहे कि, ‘भारतीय सैन्य दलासाठी मला काम करण्याची संधी मिळते हे मी माझे भाग्यच समजतो. सैन्य दलासमवेत नवीन काश्मीर घडविण्यासाठी जे काही करावे लागेल, ते निश्चितपणे मी करेल. हे काम करताना सैन्य दलाकडून मिळालेले प्रशस्तीपत्रक निश्चितपणे माझे मनोबल वाढविणारे आहे.’