सध्या उन्हाळा आणि सुट्टीचे दिवस चालू असल्यामुळे वॉटर पार्क्स मध्ये गर्दी वाढत आहे. रोमांचकारी साहसी राइड्स आणि खेळांची इथे भरमार असते. मात्र साहसी खेळाचा अनुभव घेत असतानाच एका तरुणीला आपल्या किटुंबासमोरच जीव गमावल्याची घटना पुण्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनिमित्त कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या 28 वर्षीय तरुणीचा झिपलायनिंग करताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्टमध्ये घडली. तरल आटपाळकर असे मृत तरुणीचे नाव असून ती पुण्याच्या बाणेरमधील आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होती. झिपलाइनिंगच्या तयारीत असताना ती 30 फूट उंचीवरून सिमेंटच्या ब्लॉकवर कोसळली आणि जागीच मृत्यूमुखी पडली.
अशी घडली घटना
झिपलाइनिंग हा साहसी खेळ करण्यासाठी तरलने स्टूलवर उभं राहत सुरक्षेची दोरी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टूल हलल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती थेट 30 फूट खाली कोसळली. ही घटना तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यादेखत घडली, त्यामुळे सगळे हादरून गेले. तातडीने तिला नसरापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या अपघातामुळे वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तरलच्या कुटुंबियांनी वॉटर पार्कवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून, तांत्रिक बिघाडमुळे हा अपघात झाल्याचे ते म्हणतात.
कुटुंबातील एकमेव कमावणारी मुलगी
तरल ही तिच्या कुटुंबाची एकमेव कमावणारी मुलगी होती. तिच्या वडिलांचे निधन काही वर्षांपूर्वी झाले असून, तिची आई किरकोळ शिलाईचे काम करून उदरनिर्वाह करते. डिसेंबरमध्ये तरलच्या लग्नाची तयारी सुरू होती. तिच्या अकाली मृत्युमुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वॉटर पार्कच्या चालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




