साताऱ्यातील युवक कर्दे येथे समुद्रकिनारी बुडाला : चार जणांना वाचविण्यात यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी | दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी फिरायला गेलेले सातारा येथील युवा पर्यटक बुडाल्याने खळबळ उडाली आहे. तो खोल समुद्रात गेला त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आहे.साैरभ प्रकाश घावडे (वय- 19 रा. पाचगणी, जि. सातारा) हा युवक बुडला आहे.

तर त्याच्यासोबत असलेले कार्तिक दत्तात्तम घाडगे (वय- 20), यश रघुनाथ घाडगे (वय- 19), दिनेश कृष्णदेव चव्हाण (वय-20), अक्षय उत्तम शेलार (वय- 19, सर्व रा. एकसर, ता. वाई, जि. सातारा) या चार जणांना वाचवण्यात यश आले असून ते सुखरूप आहेत. तर सौरभ हा बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध सायंकाळी उशीरपर्यंत होता. दरम्यान यांच ग्रुपमधला कुणाल घाडगे हा सहावा पर्यटक समुद्रात गेलाच नव्हता तो किनाऱ्यावरच समुद्राबाहेरच होता. त्यामुळे तो सुखरूप आहे, तर चार जणांना वाचविण्यात यश आले आहे.

एकसर व पाचगणी येथील हे सहा युवक बाईक घेऊन कोकणात फिरायला गेले होते. शनिवारी रात्री खेड येथील एक पेट्रोल पंपात थांबले. रात्रभर झोप काढून ते सकाळी दापोली तालुक्यातील हर्णै बंदरावर गेले, त्या ठिकाणी काहीवेळ फिरले. बंदरावर मासे खरेदी केले हर्णै बंदराजवळच जेवण केले. त्यानंतर ते कर्दे समुद्रकिनारी दाखल झाले. या सहाजणांपैकी पाचजण समुद्रात पोहायला गेले होते. यातील चार जणांना सुखरुप किनाऱ्यावर आणण्यात यश आले. तर यातील एक तरूण खोल समुद्रात बेपत्ता झाला आहे. मकरंद नरवणकर, मकरंद तोडणकर या स्थानिक तरुणांनी दोऱ्या व लाईफ जॅकेटच्या सहाय्याने कर्दे गावाचे सरपंच सचिन तोडणकर यांच्या उपस्थितीत हे बचाव कार्य यशस्वी केले. दरम्यान बुडालेल्या युवकासाठी शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून लाडघर येथील एका जेटीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू आहे.