Satara News : हमालावर सपासप वार करून खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये असलेल्या जरंडेश्वर कारखान्यातील हमालाचा कोयत्याने सपासप दहा वार करून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी आरोपी संतोष रावसो सातपुते (वय 28, रा. नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) याला तब्बल सात वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असणाऱ्या जरंडेश्वर कारखान्यामध्ये सोमनाथ कारभारी गोल्हार (वय 35, रा. कापशी, ता. आष्टी, जि. बीड) आणि आरोपी संतोष सातपुते हे दोघे हमाल म्हणून काम करत होते. त्यावेळी सोमनाथ गोल्हार हा सातपुतेला आई-बहिणीवरून शिवीगाळ करत होता. तसेच इतर हमालांमध्ये लावालावी करत होता. त्यामुळे संतोष हा सोमनाथवर चिडून होता. 31 डिसेंबर 2016 रोजी रात्री 11 वाजता सोमनाथ राहत असलेल्या चाळीत जाऊन संतोषने कोयत्याने त्याच्या गळ्यावर, तोंडावर, मानेवर असे 10 वार करून त्याचा निर्घृण खून केला होता.

याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात हमाल संतोष सातपुतेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तात्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. बागवे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सुनावणीवेळी एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने संतोष सातपुते याला जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सहाय्यकी अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद ओक यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलिस प्राॅसिक्यूशन स्काॅडचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत, पोलिस अंमलदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, मंजूर मणेर आदींनी सहकार्य केले.