युसुफ पठाण लोकसभेच्या रिंगणात; या पक्षाकडून निवडणूक लढवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी आक्रमक क्रिकेटपटू युसूफ पठाण (Yusuf Pathan) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. युसुफ पठाण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवणार आहे. त्याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून TMC ने तिकीट दिले आहे. याठिकाणी काँग्रेसचे अधीर चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे आता युसूफ पठाण आणि अधीर चौधरी यांच्यात आपल्याला थेट लढत पाहायला मिळणार आहे.

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या ४२ जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये कांठी येथून उत्तम बारीक, घाटल येथून अभिनेते देब, कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीने महुआ मोईत्रा, तसेच युसुफ पठाणला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी बहरमपूरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदा बहरमपूर मध्ये युसूफ पठाण विरुद्ध अधीर रंजन यांच्यात हाय वोल्टेज सामना पाहायला मिळू शकतो.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली होती. आता त्यांनी थेट उमेदवारांची यादी जाहीर करत यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेमुळे पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस आणि तृणमूलची मते विभागण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल शिवाय तृणमूल काँग्रेस आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार आहे. तसेच अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील एक जागाही लढवण्याचा ममता बॅनर्जी यांचा विचार आहे.