Zero Note : 0 रुपयांची नोट कुणी छापली ? का करण्यात आला वापर ? जाणून घ्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Zero Note | मित्रांनो, गणितात शून्याला महत्व असले तरी व्यवहारात शून्याला महत्व नाही असे म्हणतात. समाजात 1 पासून 2000 पर्यंतच्या नोटा सर्वानी पाहिल्या आहेत. खूप पूर्वी 5 हजार, 10 हजाराची नोट प्रचलित होती असे म्हणतात. पण एक शून्य किंमत असलेली 0 ची नोट पाहिलीय का ? 0 ची नोट चलनात होती, यावर तुमचा खचितच विश्वास बसणार नाही. पण अशी 0 ची नोट कुणी छापली, तिचा काय उद्देश होता, त्या नोटेचा नेमका वापर कसा करण्यात आला आणि ती किती वर्षे चलनात होती, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय चलनातील नोटा छापण्याचा आणि व्यवहारात आणण्याचा अधिकार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कक्षेत आहे. रिझर्व बँकेने 1 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंत नोटा छापल्या होत्या. व्यवहार तर अनेक जण करतात, परंतु 0 किंमत असलेली 0 ची नोट होती (Zero Note) हे सांगूनही कुणाला पटणार नाही. 0 मूल्य असलेल्या नोटेचा व्यवहारात कसा उपयोग झाला असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

0 ची नोट नेमकी कुणी छापली ? Zero Note

0 या नोट व्यवहारात आणण्यामागे भारतीय रिझर्व्ह बँक किंवा भारतीय अर्थमंत्रालय कारणीभूत नव्हते. विशेष म्हणजे या नोटेची हमी भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतली नसताना किंवा सदर नोटेला व्यवहारात वापरण्याची परवानगी नसताना तब्बल 7 वर्षे ही नोट वापरात आणली गेली. 2007 साली तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरातील एका समाजसेवी संस्थेने ही अनोखी संकल्पना राबवली होती. 5 पिलर (5th Pillar) या समाजसेवी संस्थेने (एनजीओ) हा प्रयोग समाजात केला. याच एनजीओने शून्य मूल्य असलेल्या नोटेचे पालकत्व स्वीकारले होते. या नोटेवर लोकांना एक विशिष्ट संदेश देण्यात आला होता. ही नोट हिंदी, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलगू भाषेत मुद्रित करण्यात आली होती.

0 नोटेचा असा झाला वापर

2007 च्या दरम्यान देशातील सरकारी कार्यालयांमधून अधिकारी, कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांकडे काम करण्यासाठी लाच मागत होते. आत्ताही ही परिस्थिती फारसी सुधारलेली आहे असे नाही. या भ्रष्टाचाराविरोधात 5 पिलर या समाजसेवी संस्थेने आवाज उठवला होता. 5 पिलरच्या सभासदांनी एकत्र येऊन अभिनव संकल्पना राबवत 0 रुपयांची नोट (Zero Note) मुद्रित केली. या नोटेचे वितरण सार्वजनिक स्थळी म्हणजे रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजार, विवाह समारंभ, विविध समारंभात केले. 5 पिलरने 0 ची नोट वितरित करीत भ्रष्टाचाराविरोधात रान पेटवले.

5 पिलरच्या 0 नोटेची सर्वत्र चर्चा झाली. या सामाजिक संस्थेने विवाह समारंभांत 0 च्या नोटांचे वितरण केले. विशेष म्हणजे, त्या काळी विद्यार्थी आणि जनतेने 0 नोटेचे बॅनर करून विविध राज्यातील 1,200 शाळा, महाविद्यालयात भ्रष्टाचाराविरोधात कार्यक्रम घेतला होता. अशाप्रकारे जवळपास 5 लाख लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. ही नोट 50 रुपयांच्या नोटेसारखी दिसत होती. त्या नोटेच्या दोन्ही बाजूंना भ्रष्टाचार विरोधातील शपथ छापली होती. नोटेच्या दोन्ही बाजूस ‘मी लाच घेणार नाही, लाच देणार नाही’, असा अभिनव संदेश देण्यात आला होता. 0 च्या नोटा जवळपास 25 हजार छापल्या होत्या, असे म्हटले जात आहे.