आणि गांधीजींना रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महात्मा गांधी जयंती विशेष | मयुर डुमने

७ जून १८९३ या दिवशी दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीजींना तुम्ही काळे आहात म्हणून रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले होते. या अपमानामुळे गांधीजींचे जीवन बदलून गेले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची बीजे या घटनेत पेरली गेली. काय होती ही नेमकी घटना ? जाणून घेऊ या..

पोरबंदर या गांधींजींच्याच गावातून आफ्रिकेत येऊन समृद्धी मिळवलेल्या दादा अब्दुल्ला या धनाढ्य व्यापाऱ्याला कायदेशीर सल्ला देण्यासाठी बॅरिस्टर गांधीजी आफ्रिकेत आले. दादा अब्दुल्ला केवळ धनाढ्य नसून सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे नाव होते. महात्मा गांधीजी त्या वेळी २४ वर्षाचे नवखे वकील होते. हा मुलगा आपले काम करेल का नाही अशी शंका दादांच्या मनात होती परंतु तीन दिवसांच्या सहवासात गांधीजींनी त्यांचा विश्वास संपादन केला. एका वकिलीच्या कामासाठी दादांनी गांधीजींना प्रिटोरियाला जायला सांगितले. त्यासाठी त्यांना रेल्वेचे पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले. गांधीजी बरद्वानच्या स्टेशनवर पहिल्या वर्गाच्या डब्यात बसले. त्यांची गाडी पीटरमॉरिसबर्ग या स्टेशनवर पोहोचली तेव्हा त्यांच्या डब्यात एक गौरवर्णीय इसम चढला. डब्यात कुणी काळा माणूस बसल्याचे पाहून त्याने रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांना बोलावले. अधिकार्यांनी गांधींजींकडे तुच्छतेने पाहून थर्ड क्लासच्या डब्यात जायला सांगितले. गांधीजींनी फर्स्ट क्लास चे तिकीट दाखवून थर्ड क्लास च्या डब्यात जाण्यास नकार दिला. ‘असेल फर्स्ट क्लास चे तिकीट, पण त्याचा येथे काही उपयोग नाही’ असे म्हणून त्यांनी गांधीजींना अक्षरश: धरून व उचलून डब्याखाली फेकून दिले. गाडी पुढे निघून गेली गाडी सोबत त्यांचे सामानही गेले होते. गांधीजी एकटेच त्या प्लॅटफॉर्म वर होते. विषुववृत्ताच्या खाली असलेल्या त्या प्रदेशात कडाक्याची थंडी सुटली होती. गांधीजी तसेच कुडकुडत सारी रात्र त्या स्टेशनच्या आवारात बसून राहिले. जिव्हारी लागलेला अपमान ते कसेबसे पचवत होते. गांधीजींच्या मनात विचारचक्र सुरु झाले. मायदेशात परत जावे असा विचार देखील त्यांच्या मनात आला परंतु देहाने दुबळा असलेला हा बंडखोर बॅरिस्टर खचून जाणाऱ्यातला नव्हता. कोणत्याही प्रसंगाला निर्भीडपणे सामोरे जाण्याची जिद्द गांधींजीं मध्ये होती. पुढच्या प्रवासातही गांधीजींना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. एका आलिशान हॉटेल मध्ये राहण्यासाठी गेलेल्या गांधीजींना हॉटेल चालकाने नकार दिला. प्रिटोरियाच्या कृष्णवर्णीय हॉटेलमालकानेही त्यांना त्यांचे जेवण गोऱ्यांच्या मेसमध्ये न घेता आपल्या खोलीतच घ्यावे लागेल असे बजावले. पण पुढे तेथील गोºयांनीच या ‘कुली बॅरिस्टरला’ आपल्यासोबत जेवणाची परवानगी दिली. हा सारा अपमान मुकाट्याने गिळत गांधीजी खटल्याचे काम संपेपर्यंत प्रिटोरियात राहिले व काम आटोपून ते बरद्वानला परतले.

पुढे १८९६ ला जेव्हा गांधीजी भारतात परतले तेव्हा त्यांनी कोलकात्यातील पायोनिअर या प्रसिद्ध नियतकालिकाचे संपादक डॉ चेस्नी ज्यू यांची भेट घेऊन त्यांना आफ्रिकेतील भारतीयांची कैफियत सांगितली. त्यांनी ही समस्या पायोनिअर मध्ये मांडण्याची गांधींजींना संधी दिली. गांधीजींनी ही कैफियत मांडताना ब्ल्यु बक (निळी पुस्तिका) नावाचे ९० पानी पुस्तक लिहिले .या पुस्तिकेचे सार देश व विदेशातून अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशित केले. त्याचा वृत्तांत दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच तेथील गोरयांनी त्याची होळी केली व गांधींना देशात पुन्हा पाय न ठेवू देण्याच्या प्रतिज्ञा केल्या. मात्र कोणत्याही विरोधाला न जुमानणारे गांधी पुन्हा आफ्रिकेकडे निघाले. गांधीजी आफ्रिकेत परतल्यावर त्यांना प्रचंड असंतोषाचा सामना करावा लागला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. गांधीजी निर्भीडपणे या प्रसंगांना सामोरे गेले. पुढे गांधीजींनी वर्णद्वेषाविरुद्ध, भेदभावाविरुद्ध, आफ्रिकेतील भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने मोठा लढा उभा केला. अखेर ब्रिटिश शासनाला गांधींजींच्या सत्याग्रहापुढे झुकावे लागले. १८९३ ला आफ्रिकेत गेलेले मोहनदास करमचंद गांधी आता १८९५ ला महात्मा गांधी झाले होते . अवघ्या पाच वर्षात च त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुत्रे आपल्या हातात घेतली. भरकटलेल्या, नेतृत्वहीन स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला योग्य दिशा दिली. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध उभारलेल्या लढ्यामुळे, पिटरमॉरीसबर्ग रेल्वेस्टेशन वरील अपमानामुळे हा चमत्कार होऊ शकला. तो स्टेशन वरील अपमान ही अहिंसक क्रांतीची ठिणगी ठरली .

परांजपे नावाच्या मित्राच्या लग्नात वराती मागून जाताना महात्मा फुले यांना ‘ शुद्र ‘ म्हणून तिथून निघून जायला सांगितले. या अपमानानंतर फुल्यांनी विषमतेविरुद्ध लढा उभा केला. परदेशात उच्च शिक्षण घेऊन गायकवाडांच्या दरबारात नौकरी करणाऱ्या बॅरिस्टर डॉ आंबेडकरांना, शिपाई लांबून च फाईली भिरकावत होता. वेदोक्त प्रकरणात शाहू महारांजांचा शूद्र म्हणून झालेला अपमान. या अपमानांमुळे क्रांतीच्या लढ्याला सुरवात झाली. असाच गांधीजींचा हा अपमान क्रांतिकारी ठरला. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य रुजविण्यासाठी या अपमानांची मदत च झाली.

मयुर डुमने
7775957150
(लेखक रानडे इन्स्टिट्युट, पुणे येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत आहेत)

Leave a Comment