आणि दाढी करणाऱ्याचीच दाढी करुन क्रांतिसिंह नाना पाटील इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ । भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे दोन प्रवाह होते. एक अहिंसक गांधीवादी, दुसरा म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक. भारताला स्वातंत्र्य गांधीजींच्या अहिंसा धोरणाने मिळाले असले तरी क्रांतिकारकांचे योगदान पण विसरून चालणार नाही. एखाद्या चित्रपटातील नायकाला लाजवेल असे नाट्यमय आयुष्य नाना पाटील यांनी जगले. इंग्रज मागावर असताना त्यांनी दिलेले चकवे अचंबित करणारेच. क्रांतीचा सिंह म्हणून लौकिक असलेले आणि प्रति सरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील हे क्रांतिकारी चळवळीतील थोर स्वतंत्र सैनानी होते. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी नाना एक होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला त्यांच्या लढ्याची सर क्वचितच दुसऱ्या व्यक्तीस येईल.

शिक्षण आणि बालपण

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ऑगस्ट १९०० साली येडेमच्छिंद्र ता.वाळवा जिल्हा सांगली या गावी झाला. नानांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. ते तालमीत नियमित अंग मेहनत करण्यासाठी जात असत. त्यांनी तालमीत खडतर मेहनत करून पिळदार शरीर कमावले होते. बालपणातही नाना पाटलांचे शरीर भक्कम बुरुजा समान दिसत असे. कित्येक लोक त्यांचे शरीर बघूनच त्यांना भीत असत.

तलाठ्याची नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात सहभाग

नानांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ तलाठ्याची नोकरी केली. परंतु नंतर त्यांनी १९३० सालच्या सविनय कायदे भंग आंदोलनात आपल्या नोकरीचा त्याग केला आणि गांधीवादी मार्गाने त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. १९३० ते १९४२ पर्यंत त्यांनी गांधीवादी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. आपल्या देशाचा राज्यकारभार आपल्याच लोकांनी केला पाहिजे या प्रेरणेतून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ साली प्रति सरकारची स्थापना केली. प्रति सरकार च्या माध्यमातून जनसामान्यांसाठी बाजारपेठ, पाणी पुरवठा, आरोग्यसेवा, लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा यासारखी लोक उपयोगी कामे त्यांनी केली. गावो गावी गोरगरिबांना छळणाऱ्या गावगुंडांना आळा घालण्यासाठी नाना पाटलांनी त्या गुंडांच्या तळपायाला पत्रे ठोकले म्हणून नाना पाटलांचे प्रति सरकार पत्री सरकार म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

इंग्रजांची रेल्वेगाडी लुटली

लोक चळवळ चालवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते.भूमिगत असलेल्या नानांना ते शक्य नव्हते. म्हणून नानांनी ७ जून १९४३ साली जी. डी. बापू लाड आणि नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सहाय्याने इंग्रजांची पगार घेऊन जाणारी गाडी लुटली. मिरजहुन पुण्याला जाणारी रेल्वे बिचुत आणि शेणोली स्टेशनच्या दरम्यान दगडाचा अडथळा रचून रोखण्यात आली. एका व्यक्तीने बिचुत वरून गाडी सुटल्याचा निरोप सायकलवर येऊन सांगितला. मग जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्या रेल्वे ट्रेक वर दगडे रचून रेल्वे गाडी उभी केली आणि पगाराची पेटी गाडीत चढून खाली खेचली. तिचे कुलूप तोडून १९ हजार ७१६ रुपये लुटून शेजारच्या डोंगरात सर्व क्रांतिकारक पसार झाले. हि लूट केवळ १६ जणांच्या साहाय्याने करण्यात नाना पाटील यशस्वी झाले होते.

दाढी करणाऱ्याचीच दाढी करुन नाना इंग्रजांनाच्या हातावर तुरी देऊन पळून गेले

प्रति सरकारच्या स्थापनेमुळे आणि क्रांतिकारक कार्यवाह्यांमुळे नाना पाटलांच्या अटकेसाठी इंग्रज प्रयत्नशील होते. याचदर्म्यान एक दिवस नाना पाटील पारावर दाढी करत असल्याची वार्ता एका गुप्तहेराने इंग्रज पोलिसांना दिली. त्यानुसार इंग्रज पोलीस तत्परतेने नानांना अटक करण्यासाठी त्या गावातील पाराजवळ पोहोचले. आता नानांना अटक होणार असे वाटत होते. मात्र नाना चपळ होते. त्यांनी दाढी करत असतानाच समोरच्या आरशात पोलीस आपणाला पकडण्यासाठी येत असल्याचे पाहिले होते. आता काहीतरी क्लूप्ती लढवावी लागणार होती. नानांनी मोठया शितापिणे आपल्या दाढीचा साबण पुसला आणि दाढी करणाऱ्या व्यक्तीला स्वत:च्या जागी बसवून ते दाढी करणार्याचीच दाढी करु लागले. नानांनी आपल्या दाढीचा साबण काढून समोरच्याला लावल्याने इंग्रज पोलीस आले आणि नाना पाटील समजून त्या न्हाव्यालाच पकडून घेऊन गेले. इंग्रज पोलिसांना त्यांची चूक लक्षात येई पर्यंत नाना पाटील अदृश्य झाले होते. या प्रसंगात नानांनी लढवलेली युक्ती त्यांना तारून गेली.

आईच्या अंत्यदर्शनाला नाना वेशांतर करुन आले आणि तिर्डीवर झोपून गेले..इंग्रजांना पत्ताही लागला नाही

नाना पाटलांच्या क्रांतिकारी कार्य वाह्या थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. इंग्रजांच्यासाठी नानांना पकडणे खूपच जिकरीचे होऊन बसले होते. नानांची प्रसिध्दी दिवसेंदिवस वाढत होती. जी डी बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली नाना पाटलांनी तुफान सेनेची स्थापना केली होती. तुफान सेनेने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. इंग्रजांसाठी नानांना पकडणे महत्वाचे ध्येय बनले होते. अशातच नानांच्या आईचे निधन झाले. आईच्या अंत्य दर्शनाला नाना नक्की येणार अशी इंग्रजांना खबर लागली. नानांच्या राहत्या घराला इंग्रजांनी वेढा टाकला. नाना आईच्या अंत्य दर्शनाला आले परंतु वेषांतर करून. इंग्रजांना जरा ही सुगावा लागला नाही. पोलीस घरात येरझाऱ्या घालत होते परंतु ते नानाला ओळखू शकले नाहीत. नानांनी आईचे शव पोत्यात भरून जाळण्यासाठी आणलेल्या सरपणाच्या गाडीत भरून स्मशान भूमीत पाठवले आणि स्वतः तिरडीवर झोपून स्मशानभूमीत गेले. आपल्या भीतीने नाना पाटील आईच्या अंत्य दर्शनाला आलाच नाही या अविर्भावात इंग्रज गावातूनच माघारी निघून गेले ते स्मशानभूमीत आलेच नाहीत. इंग्रज गावातूनच निघून गेल्याने नानांनी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले आणि नाना तिथूनच अदृश्य झाले.

संसदेत मराठीतून भाषण करणारे नाना पहिले खासदार

नानांच्या क्रांतिकारी घडामोडींनी इंग्रज सरकारने दहशत खाल्ली होती. १९४२ ते १९४६ च्या सतत चालू असणार्या क्रांतीकार्याने इंग्रज आवक झाले होते. त्यावेळी नानांच्या प्रति सरकारच्या अधिपत्याखाली एकुण १,५०० गावे आली होती. वाळवा, कुंडल, कऱ्हाड, सातारा ही नानांच्या चळवळीची प्रमुख केंद्र बनली होती. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर अदृश्य असणारे नाना पाटील कऱ्हाडमध्ये प्रकट झाले. २६ मे १९६६ साली मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये भरलेल्या सभेत आचार्य अत्रे यांनी क्रांतिकारक नाना पाटील यांना क्रांतीसिंह ही पदवी बहाल केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाना पाटलांनी १९५७ सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली. १९६७ साली बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदरवार म्हणून ते निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे नाना पाटील हे पहिले खासदार ठरले. नानांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात वाळवा गावात राहणे पसंत करत. ६ डिसेंबर १९७६ साली क्रांतिसिंह नाना पाटील आपल्यातून निघून गेले.

सुरज शेंडगे

९६०४७०७७४८

(लेखक इतिहास व राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत)

Leave a Comment