आयपीएल 2020 : ‘हे’ 4 असे माजी कर्णधार ज्यांना यावेळी अंतिम अकरा मध्ये स्थान मिळणे कठीण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये होणार आहे. हा हंगाम सुरु होण्यास काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या या हंगामासाठी सर्व खेळाडू युएईमध्ये जोरदार तयारी करत आहेत आणि ते त्यांच्या संघाकडून खेळण्यासाठी उत्सुक देखील आहेत. आयपीएलच्या यंदाच्या संघांमध्ये प्रत्येक संघाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असणारे कर्णधार आहेत.

तसे पाहता सर्व संघांचे कर्णधार यापूर्वीच ठरवले गेले आहेत. अशा परिस्थितीत कर्णधारपदाचा अनुभव असणाऱ्या बर्‍याच खेळाडूंना संघात संधी मिळेलच असे नाही. तर या लेखात त्या ४ कर्णधारांविषयी जाणून घेऊ ज्यांना कदाचित बाहेर बसावे लागेल

या मोसमात या ४ कर्णधारांना बाहेर बसावे लागू शकते

केन विल्यमसन –
दिग्गज फलंदाज आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन याचे कर्णधार म्हणून जबरदस्त रेकॉर्ड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो तीनही स्वरूपात न्यूझीलंडचे नेतृत्व करीत आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडच्या संघाने गेल्या वर्षी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. केन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे.

केन विल्यमसनने २०१८ आणि २०१९ मध्ये काही सामन्यांमध्ये सनरायझर्सचे नेतृत्व केले. पण यावेळी केन विल्यमसनला सनरायझर्स हैदराबादच्या अंतिम अकरामध्ये संधी मिळणे फारच अवघड असेल. कारण, आयपीएलच्या एका नियमानुसार एका सामन्यात केवळ चार परदेशी खेळाडू खेळू शकतात आणि या संघात सध्या काही स्टार परदेशी खेळाडू आहेत.

मोहम्मद नबी –
अफगाणिस्तानचा कर्णधार असलेला मोहम्मद नबीन आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघात खेळत आहे.
या संघाकडून त्याला सातत्याने संधी मिळाली नाही, परंतु जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने गोलंदाजी किंवा फलंदाजीतुन चांगले योगदान दिले आहे. मोहम्मद नबी पुन्हा एकदा सनरायझर्सकडून खेळण्यासाठी तयार आहे. पण राशीद खान जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर संघात असल्याने त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळेल असे वाटत नाही.

अजिंक्य रहाणे –
अजिंक्य रहाणे हा भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. कसोटीत बऱ्याच वेळा त्याने विराट कोहलीच्या गैरहजेरीत भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याने आयपीएलच्या मागील हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले आहे.

पण यावेळी तो दिल्लीच्या कॅपिटल संघात सहभागी झाला आहे. रहाणे हा सलामीवीर फलंदाज आहे, परंतु दिल्ली कॅपिटलच्या संघात सलामीसाठी बरीच स्पर्धा आहे. यामध्ये शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यात स्पर्धा होत आहेत. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेला यावेळी अंतिम अकरामध्ये संधी मिळेल असे वाटत नाही. अगदीच संधी मिळाली तरी ती फार कमी सामन्यात असेल.

फॅफ डू प्लॅसीस –
फाफ डु प्लेसिस दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या तिन्ही स्वरूपातील कर्णधार होता. त्याने दक्षिण आफ्रिका संघाचे बराच काळ कर्णधारपद सांभाळले होते.

आयपीएलमध्ये त्याला कधीही कर्णधारपदाची संधी मिळाली नाही, परंतु तो चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघात ड्यू प्लेसिसला जास्त खेळण्याची संधी मिळत नाही. तो प्रत्येक हंगामात बर्‍याच सामन्यांमध्ये बाहेर बसलेला असतो. सीएसकेच्या संघामध्ये बरेच चांगले परदेशी खेळाडू आहेत, म्हणून यावेळी त्यालाही बाहेर बसावे लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

You might also like