कोरोनामुळं औरंगाबाद पालिकेचा मुशायरा रद्द; पोलिसांची संगीत रजनी मात्र रंगणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात कुठेही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे ८ मार्च रोजी मनपाने आयोजित केलेला मुशायरा रद्द केला आहे. परंतु, त्याच शहरात पोलिस आयुक्तांनी पोलिस कल्याण निधीसाठी आयोजित केलेला संगीत रजनी कार्यक्रम मात्र होणार असल्याचे जाहीर केले आहे.यावरून नागरिकांच्या आरोग्याचे पोलिस विभागाला काही देणे-घेणे नाही, असे दिसते. शासनाचा आदेश पायदळी तुडवून पोलिस विभाग हा कार्यक्रम घेत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. जगभरात त्याची दहशत पसरली आहे. वैद्यकीय क्षेत्र यामुळे पूर्णपणे हादरून गेले असून शासनाने खबरदारीच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. सार्वजनिक समारंभ घेऊ नयेत, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही मनपाने मुशायरा ‘एक शाम बशर नवाज के नाम’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा कार्यक्रम मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी रद्द केल्याचे जाहीर केले. तसेच, राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये, असे आदेश दिल्यामुळे हा कार्यक्रम रद्द केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

त्याचवेळी ७ मार्च रोजी शहर पोलिस दलाच्यावतीने पोलिस कल्याण निधीसाठी संगीत रजनीचा कार्यक्रम जबिंदा लॉन्स येथे आयोजित केला आहे. मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम होणार असून पोलिसांनी महिनाभरापासून तिकीट विक्री केली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे.कोरोनाच्या दहशतीमुळे हा कार्यक्रमदेखील रद्द होतो की काय असे सर्वांना वाटत होते. परंतु, पोलिस आयुक्तांनी नागरिकांच्या आरोग्यापेक्षा संगीत रजनीला अधिक प्राधान्य दिल्याचे यातून दिसते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment