गरिबांच्या स्वप्नांची दुनिया दाखवणारा – खारी बिस्कीट

HELLO महाराष्ट्र टीम| एखाद्याला हसवायचं असलं ना तर प्रत्येकवेळी अक्कलच पाहिजे असं नाही, त्याच्यावर असलेल्या प्रेमानं पण ते करता येतं. आयुष्य जगायचं तर प्रत्येकाला एखादं खोटं पुढं रेटावच लागतं. असंच एखादं खोटं आपल्या उराशी बाळगून प्रेम करत रहायचं. हेच प्रेम एखाद्याला किती आपलंसं करुन सोडू शकतं याची कहाणी म्हणजे खारी बिस्कीट.

बहिणीला क्रिकेटच्या देवाला भेटवण्याच्या स्वप्नासाठी भावाची चाललेली धडपड, त्यांच्यातील प्रेमाचा बंध खारी बिस्कीटमध्ये उलगडून दाखवला आहे. लहानपणापासून मोनॅको किंवा क्रॅक-जॅक ही खारी बिस्किटांची नावं आपण ऐकत आलोय. ही बिस्किटं जशी दुकानात मिळतात तशी त्याची रस्त्यावर, सायकलवर विक्री करणारे लोकही आहेतच. अशाच एका खारी बिस्कीट विक्रेतीची दोन मुलं म्हणजे खारी आणि बिस्कीट. मुंबईच्या फुटपाथ शेजारील वस्तीवर राहून आपलं जीवन जगणारी ही मुलं. मुलीचं नाव खारी तर मुलाचं बिस्कीट. खारी पूर्णपणे अंध असल्यामुळे तिला दिसत नाही. तिला जग समजवून सांगायचा प्रयत्न तिचा भाऊ बिस्कीट करत असतो. खारीच्या कानावर वाईट गोष्टी पडता कामा नयेत हा त्यांच्या आईने सांगितलेला संदेश बिस्कीट कटाक्षाने पाळत आलेला असतो.

आईच्या अपघाती मृत्यूनंतर बहिणीला आनंदी ठेवण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं बिस्कीट करत असतो. वस्तीवर अतिक्रमणाचं असलेलं संकट, वस्तीतल्या टपोरी पोरांकडून होणारा त्रास हे सगळं चित्रपटात ओघाने येतंच. चित्रपटाची खरी कहाणी सुरू होते २०११ च्या क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नापासून. खारी जे बोलते ते खरं होतं या भाबड्या आशेतून खारीला दिसत नसलं तरी वर्ल्डकप बघायचा असतो. त्याहून महत्वाचं सचिनचा शेवटचा वर्ल्डकप असल्याने तिला तिच्या इच्छेने सचिनला तो जिंकूनही द्यायचा असतो.

वर्ल्डकपची मॅचचं तिकीट मिळवण्यासाठीचा प्रवास उत्तरार्धात सुरू होतो. गाड्यांचे लोगो चोरून पैसे मिळवण्याचा मार्ग बिस्कीट पहिल्यांदा वापरतो. बिस्किटाच्या पुड्यांचा कागद स्क्रॅच करुन आपल्याला तिकीट मिळेल या भाबड्या आशेवर ३०० रुपयांचे बिस्कीट पुडे विकत घेण्याचा अयशस्वी प्रयोगही बिस्कीट करून बघतो. बिस्कीट पुडे घेऊन मॅचचं तिकीट मिळवण्याचा प्रवास असाच पुढे सरकत राहतो आणि पुढे आणखीनच रंजक होत जातो.

मॅच जिंकावी म्हणून भाबडेपणाने अनेक गोष्टी करणारे खेळाडू आणि लोकसुद्धा आपण पाहिलेत. यामध्ये मॅच जिंकावी म्हणून गौतम गंभीरचं आऊट झाल्यानंतरही पॅड न काढणं, गांगुलीचं नखं खात राहणं, सचिन आऊट होऊ नये म्हणून लोकांनी देव पाण्यात ठेवणं हे सगळे प्रकार आपण अनुभवलेतच. खारी बिस्किटमध्येसुद्धा अशीच आयडीया कामाला येते.

सचिनला वर्ल्ड-कप जिंकून देण्याचं स्वप्न धोनीच्या टीमने २०११ साली करून दाखवलंच पण या जिंकण्यात ‘खारी’चा वाटासुद्धा खारीचा होता. खारी गरीब असली तरी स्वप्न पहायचा अधिकार तिलाही होता आणि ते पूर्ण करण्याचा बिस्किटला..

कसा ते पहायचंय, तर मग नक्की पहा – खारी बिस्कीट

आणखी काही महत्वाच्या बातम्या-

You might also like