जाणून घेऊया, डाळींब पिकावरील तेल्या रोगाची माहिती, लक्षणे आणि उपायही 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रात डाळिंबचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. राज्यात उतपदित झालेले डाळिंब हे देशातच नव्हेतर परदेशातही निर्यात केले जातात. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत असलेला पाहायला मिळते आहे. मात्र आता डाळिंबाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. झाडांची योग्य निगा राखणे. वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करणे. बागेत स्वच्छता ठेवणे यासह विविध बाबींवर वेळोवेळी लक्ष ठेवावे लागते. असे नाही केले तर बागेवर विविध प्रकारच्या रोगांचे आक्रमण होत असते.  आज आपण डाळिंबाच्या बागेवर आक्रमण करणाऱ्या तेल्या या रोगाविषयी माहिती घेणार आहोत.

तेल्या हा रोग झान्थोमोनास आक्झानोपोडीस पीव्ही पुनिकी या अणुजिवामुळे होतो. रोगग्रस्त भागातून आणलेल्या गुटीकलमाचा वापर केल्यास बागेत प्रथम रोगाची लागण होते. या रोगाची सुरुवात ही झाडाच्या पानांपासून होते. सुरुवातीला पानावर लहान आकाराचे लंब गोलाकार ते आकारहीन पानथळ तेलकट डाग येतात. हे डाग १ ते २ सेंमी. आकाराचे असतात.  नंतर हे काळपट रंगाचे होतात. या डागाच्या बाहेरील बाजूस पिवळे वलय असते. हळूहळू रोगग्रस्त पाने पिवळी पडतात त्यामुळे या रोगाचे निदान होते. पानांसह फुले, फांदी व फळावर देखील हा रोग आक्रमण करतो. फळावर देखील पानांप्रमाणे डाग पडतात व ते कालांतराने मोठे होत जातात. तसेच फांदीवर देखील या रोगाचे टिपके पडतात वेळीच फवारणी झाली नाही तर काही दिवसांनी फांदी वळून जाते. त्यामुळे फळाचे नुकसान होते. दरम्यान हा रोग पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बळावतो. कारण या रोगासाठी उपयुक्त असणारे हवामान या काळात उपयुक्त असते. त्यामुळे शेतऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो.

हा रोग बागेवर पडू नये म्हणून पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व खोडांना जमिनीपासून दोन फुटापर्यंत बोर्डो पेस्टचा लेप लावावा. झाडाची छाटणी केल्यानंतर खोडावर व छाटलेल्या भागावर कॉपर ऑक्सीक्लोराईड १५ ग्रॅम + कार्बारील ६ ग्रॅम + डी. डी. व्ही.पी. ३ मिली + १ मिली स्टिकर पाण्यात मिसळून तयार झालेल्या द्रावणाचा मुलामा द्यावा. तसेच ब्लिचींग पावडर अथवा कॉपरडस्ट (४ %) १० किलो प्रती एकर प्रमाणे जमिनीवर धुरळणी करावी. यामुळे बागेवर रोग येण्यापासून रोखण्यास मदत होईल.

तेल्या या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध कंपन्यांनी वेगवेगळी औषधे तयार केलेली आहेत. यातील बहुतांशी औषधे ही जैविक औषधे आहेत. यात तेल्या रामबाण हे एक लिटर औषध २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच SV Rounder P हे औषध उपलब्ध आहे. या औषधांची फवारणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ही औषधे बनवऱ्या कंपनीच्या सल्लागारांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. जेणेकरून रोगाची तीव्रता लक्षात घेऊन ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून तुमच्या बागेत आलेल्या तेल्या या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी तुम्हाला मदत करतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like