देशवासियांनो कोरोनापासून स्वत:चा जीव स्वतः वाचवा कारण पंतप्रधान मोरांसोबत व्यस्त आहेत- राहुल गांधी

नवी दिल्ली । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील करोनाच्या वाढत्या प्रसारावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मोदी सरकारनं म्हटलंय आत्मनिर्भर बना म्हणजेच तुमचा जीव तुम्ही स्वत:च वाचवा कारण पंतप्रधान मोरांसोबत व्यग्र आहेत’ असं म्हणत शेलक्या शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे. कोरोना संक्रमणाचे आकडे या आठवड्यात 50 लाख आणि सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १० लाखांच्या पार गेलेली असेल. अनियोजित लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराचा परिणाम आहे ज्यामुळे करोना देशभरात फैलावला गेला, असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.

विशेष म्हणजे, कोरोना संकटकाळा दरम्यान संसदेत आजपासून १८ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. यावेळी संदेत चीनची घुसखोरी, देशासमोरील आर्थिक आव्हानं यासंबंदी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार असल्याचं दिसतं आहे. विरोधकांकडून सभागृहात अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळण्याची मागणी केली जातेय तर दुसरीकडे सरकारचा मात्र जवळपास दोन डझन विधेयके संमत करण्यावर भर आहे.

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लाखाच्या जवळपास लोक दिवसाला कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. यामध्ये ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७९ हजार ७२२ जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. भारतातील कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण ७७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like