नितेश राणेंचे अमित शहांना पत्र; कंगनाप्रमाणेच ‘या’ व्यक्तीला सुरक्षा देण्याची केली मागणी

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध जोडत थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. नितेश राणेंनी दिशा सालियनचा पार्टनर रोहन रॉयला सुरक्षा देण्याची मागणी अमित शाहांना केली आहे. रोहनने कुणाच्या तरी दबावामुळे मुंबई सोडली असावी, असा त्यांचा अंदाज लावत त्यांनी ही मागणी केली आहे.

दिशा रोहनसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती, तिच्या मृत्यूच्या वेळी तो तिथे उपस्थित होता आणि काही वेळानंतर निघून गेला, पण त्याची अजून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. कुणाच्या तरी दबावामुळे त्याने मुंबई सोडली असावी, असं नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे. यापूर्वीही भाजप खासदार नारायण राणे यांनी या प्रकरणात धक्कादायक आरोप केले होते. दिशावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली, असं राणे म्हणाले होते. दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसातच सुशांतचाही मृतदेह आढळून आला. या दोन्ही मृत्यूंचा काही संबंध आहे का, असा प्रश्न यापूर्वीही उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, सीबीआय सध्या सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे.

दिशा सालियनचा मृत्यू हे अजून गूढ आहे. ती रोहन रायसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती आणि त्याची साधी चौकशीही केलेली नाही. दिशाचा मृत्यू झाला तेव्हा रोहन इमारतीत उपस्थित होता आणि ती खाली पडलेल्या ठिकाणी तो २० ते २५ मिनिटांनी गेल्याचंही बोललं जातं. त्यामुळे शंका निर्माण होते, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. चौकशी टाळण्यासाठी रोहनने मुंबई सोडली असावी किंवा त्याला कुणाच्या तरी दबावामुळे मुंबई सोडणं भाग पडलं असावं, असा अंदाज आहे. यामुळे रोहन मुंबईत येताना त्याला पूर्ण सुरक्षा देण्यात यावी. सीबीआय तपासात रोहनचं म्हणणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. कारण, दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध आहे, असा माझा विश्वास आहे, असं नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like