” बिहारमध्ये कोरोना संपलाय का “?, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये करोना संपलाय का ?असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “सरकारला, तेथील राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की कोरोना संपला तर मग तसं जाहीर करा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. “हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये लोकांना फक्त काळी शाई लावून घ्यायची नाही असेही राऊतांनी स्पष्ट केले. लालूप्रसाद यादव आज इस्पितळात आहेत. काँग्रेसचं तिथं फार अस्तित्व नाही. अशावेळी जनता दल युनायटेड आणि भाजपा एकतर्फी निवडणुका लढणार का? अशी लोकांच्या मनात शंका आहे. पण लोकशाहीत शंकांचा विचार न करता लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. “निवडणुका घाईघाईत होत नसून वेळेतच होत आहेत, मात्र सध्या निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती नाही,” असंही ते म्हणाले.

बिहारमध्ये कृषी आणि कामगार बिलाचा काही फरक पडणार नाही. तिथे फक्त जात आणि धर्म हा मुद्दा असून अनेकदा गरीबी हादेखील मुद्दा नसतो. नितीश कुमार २४ वर्ष तिथे मुख्यमंत्री आहेत. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी सुप्त राग असल्याचं दिसत आहे. समोर विरोधी पक्ष किती ताकदीने उभा राहतो यावर सर्व अवलंबून आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवढणुकीचा निकाल जाहीर होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like